किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्रातील मराठी भाषेतील बोली भाषेचे संवर्धन व संगोपन व्हावे यासाठी सातत्यपूर्ण कार्य करणारे डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी नागपूर येथे मराठी बोली साहित्य संघाची स्थापना केली असून, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील लुप्त होत असलेल्या बोलीभाषेंचा अभ्यासकांनी करावा त्याचे संवर्धन करावे, संकलन करावे व आपले लोक साहित्य जतन करावे. यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील अभ्यासकांवर त्या त्या भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठवाडा विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीचे सदस्य तथा लोकसाहित्याचे व बोली भाषेचे अभ्यासक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
मराठवाड्यात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात त्या अनुषंगाने त्या संबंध बोलीभाषेंचे संवर्धन व्हावे त्या बोलीभाषेतील लोक साहित्याचाअभ्यास व्हावा हा या मराठी बोली साहित्य संघाचा हेतू आहे. आधुनिकतेच्या काळात लुप्त होत असलेल्या बोलींचे संवर्धन होणे गरजेचे आहे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मराठी बोली साहित्य संघाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच मराठी बोली साहित्य संघाच्या वतीने एका संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष तथा मालवणी बोलीचे अभ्यासक डॉ बाळकृष्ण लळीत यांनी सांगितले आहे.
डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ नाट्य लेखक तथा विचारवंत प्राचार्य दत्ता भगत ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, ज्येष्ठ लेखक दत्ता डांगे, ज्येष्ठ बालसाहित्यीक माधव चुकेवाड त्याचबरोबर सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार.. सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा बोली भाषेचे अभ्यासक डॉ. आनंद भंडारे, बंजारा बोलीभाषेचे अभ्यासक वसंतराव राठोड व सहकारी मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.