मुंबई| भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
“भास्करराव पाटील खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा केला जाईल. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला आणखी बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील”,असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पुन्हा माझ्या घरी आल्याचा आनंद होत आहे. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रीपदावर काम करण्याची संधी दिली आहे. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो पण आता घरी आलो आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होत असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे खतगावकर म्हणाले. या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी माजी मंत्री डी. पी. सांवत, आमदार मोहनराव हंबर्डे व नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.