हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कदम नगर परिसरात तालुका देखरेख संघाचे कार्यालय गेली २०-२५ वर्षे बंद अवस्थेत आहे. सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या या सरकारी इमारतीचे बांधकाम अंदाजे १०-१२ फूट अतिक्रमण करून करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आपल्या निवेदनात केला आहे.


या अतिक्रमणाची दखल घेऊन इमारत हटविण्याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने सादर करण्यात आली, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या बंद पडलेल्या इमारतीत सध्या साप, विंचवांसारख्या विषारी प्राण्यांनी आश्रय घेतला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शिवाय, इमारतीशेजारील रस्ते इतके अरुंद झाले आहेत की फक्त दुचाकी वाहनांनाच त्या मार्गाने जाणं शक्य होतं.


बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण…..!
या इमारतीच्या दक्षिणेकडील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील लहान मुले खेळायला जातात. मात्र आता त्या ठिकाणी विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याने ही जागा धोकादायक बनली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जर लवकरात लवकर योग्य ती कारवाई झाली नाही, तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

प्रशासन का आहे गप्प…?
मुख्याधिकारी, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने दिली गेली आहेत. इतकेच नव्हे तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकां मध्ये मतदान बहिष्काराचाही इशारा नागरिकांनी दिला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकरणामागे एका बड्याराजकारण्या चा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याचीही चर्चा असून, त्यामुळेच प्रशासन या प्रकरणात पावले उचलायला तयार नाही, असा आरोप होत आहे. दत्ता पाटील सुकळकर, सुदर्शन पाटील तवर, माधवराव वडगावकर, भगवान मोरे, श्रीहरी मोरे, पांडुरंग पवार, पंडितराव डोके, शुभम केदारे, ज्ञानेश्वर रावते, विनोद शिंदे, प्रशांत कदम या नागरिकांनी यासंदर्भात विविध स्तरांवर तक्रारी दाखल केल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. आता सरकार आणि प्रशासन या गंभीर विषयाकडे लक्ष देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे