देगलूर,गंगाधर मठवाले। तालुक्यातील शहापूर येथून जवळच असलेल्या सांगवी उमर येथील शिक्षक हाणमत रामा लघूळे हे बिलोली येथे बहिणीकडे भेटायला जावून परत येत असताना गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री झालेल्या ढगफुटी सारख्या पावसामुळे वनाळी शहापूर मधील नाल्याच्या प्रवाहात पाण्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकल सकट वाहून गेल्याने मयत झाले आहेत. त्यांच्या अकाली निधनाने सांगवी उमर गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाच सहा महिण्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पवित्र पोर्टल नूसार शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले, आता कुठे त्यांच्या कुटुंबात चांगले दिवस आले होते. नुकतेच शाळेवर सूटी घेऊन गावाकडे आले होते, दरम्यान बहिणीला भेटावयास जावून परत गावी येत असताना अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वनाळी शहापूर मधील नाल्याला महापूर आला. दरम्यान पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेले.
गावाकडे निघालेले शिक्षक रात्री न आल्याने घरच्यांनी बहिणीकडे व पाहुण्याकडे संपर्क केला असता ठावठिकाणा लागत नसल्याने लोकेशन पाहून आणि वनाळी येथील हनुमान मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरात गणेश चतुर्थीच्या रोजी रात्री नऊ वाजता वनाळी गावातून गेल्याचे दिसून आले. दरम्यान चोवीस तास उलटल्यानंतर नाल्यात रात्री दहा वाजता वनाळी गावातील काहींनी नाल्यात उतरून पहानी केली असता अगोदर मोटरसायकल हाताला लागली मग काही अंतरावर शिक्षकांचं मृतदेह चौतिस तासांनंतर आढळून आला.
त्यांच्या निधनाची माहिती सांगवी उमर येथील कुटुंबास आणि गावातील शेजारी येऊन पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्यानंतर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने लघूळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्या निधनाने शहापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.