उमरी| तालुक्यातील हातणीवरुन विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या एका ऑटो समोर आलेल्या हरणाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो उलटला आहे. या दुर्घटनेत एक विद्यार्थी ठार झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.१९ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
नांदेड जील्ह्यातील बळेगाव येथे असलेल्या कृष्णाई हायस्कूल येथे दररोज शाळेच्या ऑटो मधून विद्यार्थ्यांची ने आन केली जाते. शुक्रवारी सकाळी हातणीवरुन ९ वाजता विद्यार्थ्यांना घेवून सदर ऑटो बळेगावच्या दिशेने निघाली. ऑटो भरधाव वेगात जात असताना अचानक रस्त्यात हरण आले, त्या हरनाला वाचविण्याच्या नादात हातणी ता. उमरी येथील रस्त्यावर खाली उरल्याने ऑटो उलटला. या दुर्घटनेत ऑटोमधील गणेश गोविंद निलेवाड व १३ वर्षे वर्ग ७ वा हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर साक्षी सय्याजी निलेवाड वय १५ वर्षे वर्ग ८ वा व विनायक माधव मोघले वय १३ वर्षे हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच बळेगाव, हातणी येथील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी पालकांनी मोठी गर्दी केली होती. तातडीने जखमींना उपचारासाठी सुरुवातीला उमरी येथील रुग्णालयात नेण्यात आले. परनु विद्यार्थी अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी विष्णुपुरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी उमरी येथील पोलिसांनी भेट दिली असून, सदर व्हॅनचा चालक फरार झाला आहे. हा अपघात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे.