नांदेड| मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी रांगोळी स्पर्धा घेण्यात येते, या वर्षीही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन ही स्पर्धा अतिशय आनंददायी वातावरणात पार पडली. प्राचार्य डॉ. हरिदास राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख. प्रा. डॉ. श्रीनिवास पवार यांच्या सहकार्याने व प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांच्या संकल्पनेतून वरील ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला व धाराशिव या जिल्ह्यातील एकुण ८७ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी गाय-वासरू, बैल, कुत्रा, मांजर, ससा, पोपट, घोडा, कबुतर, मोर, कासव, शेळी, हत्ती, मासे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या विविध रंगांचा वापर करून रांगोळी साकारल्या होत्या. मनुष्य आज अनेक प्रकारच्या प्राण्यांचे विविध कारणांसाठी पालन करीत आहे. एकमेकांच्या सान्निध्यामुळे दोघांमध्ये भावनात्मक मैत्रीचे संबंध अभावितपणे प्रस्थापित केले जातात. दोघांनाही एकमेकांविषयी आस्था वाटू लागते आणि एक प्रकारचे समाधान मिळते. हा संबंध सहजीवी आहे असे म्हटले, तर वावगे होऊ नये.
प्राणी केवळ छंद, मैत्री, अभ्यास किंवा शौकाकरिता पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना ‘पाळीव प्राणी’ (आवडते प्राणी, पेट ॲनिमल्स) ही संज्ञा वापरलेली जाते. मनुष्यमात्राचा आणि प्राण्यांचा संबंध इतिहास कालापेक्षाही प्राचीन आहे; परंतु त्या काळी ‘पाळीव प्राणी’ या संज्ञेला काही अर्थ नव्हता. रानटी अवस्थेतील मानव प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी त्याची शिकाऱ्याची भूमिका हळूहळू बदलत जाऊन अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी तो प्राण्यांचे कळप पाहू लागला. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, लामा, अल्पाका, ससे, डुकरे हे प्राणी मुख्यत्वे दूध, मांस या खाद्यपदार्थांसाठी व चामडी, शिंगे, लोकर इत्यादींच्या उत्पादनासाठी म्हणजे मानवाच्या गरजा भागविण्यासाठी पाळले जाऊ लागले. बैल, घोडा, खेचर, उंट व गाढव हे प्राणी ओझे वाहण्यासाठी आणि शेतीच्या व इतर कामांसाठी चलशक्ती पुरविण्यासाठी त्याने जवळ केले. वाघ, सिंह, अस्वल यांसारखे हिंस्त्र प्राणी वैयक्तिक रित्या माणसाळवून त्यांचे पालन तो अर्थोत्पादनासाठी व मनोरंजनासाठी करू लागला.
सुरुवातीच्या काळात असे आवडते प्राणी त्याने माणसाळलेल्या प्राण्यांपैकीच निवडले असले, तरी आजमितीस तो पाळीव असलेले सर्व प्राणी माणसाळलेलेच आहेत असे नाही. काही वन्य प्राणी जबरदस्तीने बंदिस्त करून पाळण्यात येतात. तरीसुद्धा सान्निध्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबध प्रस्थापित होतात. या मैत्रीत प्राण्याकडून मिळणारा प्रतिसाद त्या त्या प्राण्याच्या स्वभावधर्मानुसार असतो. घोडा, कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांना हवे असलेले सुखसमाधान मानवाकडून मिळाल्याने त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळून ह्या प्राण्यांची मानवाशी अधिक दृढ मैत्री झाली. मानवाच्या इतिहासातील सर्व संस्कृतींमध्ये तो आवडते प्राणी केवळ मैत्रीकरिता पाळीत आल्याचे दिसून येते.
या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश असा की विद्यार्थी जो विषय शिकतो याबद्दलची जागृकता निर्माण व्हावी व याबरोबरच पाळीव प्राण्यांची ओळख त्यांचे महत्त्व व संगोपन कसे करावे याबद्दलची जाणीव त्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. म्हणूनच उपरोक्त ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.डोंगरे सुषमा बाळासाहेब, दयानंद कॉलेज ऑफ लॉ लातूर, हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय, नांदेड चा विद्यार्थी जोशी कौस्तुभ कृष्णा याने पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातुरची विद्यार्थिनी कु.भोसले आकांक्षा बाळासाहेब हिने पटकावला. या स्पर्धेतील गुणवंताना ई-प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रथम १०००, द्वितीय ७००, व तृतीय ५०० प्रत्येकी देवुन सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे सचिव प्राचार्य गंगाधररावजी राठोड, मुखेड-कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषारजी राठोड, प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.डॉ.बळीराम राठोड, प्रसिद्धी प्रमुख प्रो.डॉ.रामकृष्ण बदने, नॅकचे समन्वयक प्रो.डॉ. उमाकांत पदमवार यांनी सर्व स्पर्धक व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.श्रीनिवास पवार, संयोजक प्रा.डॉ.महेश पेंटेवार,परिक्षक प्रो.डॉ.गुरुनाथ कल्याण श्री.नागेश सोनकांबळे श्री.शौकत शेख, श्री.अतुल येवतीकर व सर्व सहभागी स्पर्धक यांच्या प्रयत्नामुळे रांगोळी स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.