नांदेड। देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देवून या रुग्णालयात 30 खाटांचा समावेश करावा, यासाठी गावच्या सरपंच सौ.शारदादेवी शंकरराव राठोड यांच्या मागणीचा आ. राम पाटील रातोळीकर यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने शासनाने अखेर या गावाला विशेष बाब म्हणून 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास तत्वतः मान्यता दिली आहे. आ. रातोळीकरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल सरपंचासह ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.


हणेगांव ता.देगलूर हे गांव महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक या तीन राज्यांच्या सिमावर्ती भागातील 15 हजार लोकवस्तीचे एक मोठे गांव आहे. या परिसरातील सुमारे 40-45 खेडेगावांचे हे मध्यवती ठिकाण आहे. रुग्णांच्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी या केंद्रात अपुर्या सोयीसुविधा असल्यामुळे येथील रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याने या आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्याची मागणी सरपंच सौ.शारदादेवी राठोड यांनी शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली होती.शिवाय त्यांनी आ. राम पाटील रातोळीकर यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली होती.

या परिसरातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक असल्याने व रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी आ. रातोळीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देेेंवेंद्र फडणवीस आणि प्रशासकीय स्तरावर कायदेशीर बाबींची पूर्तता करून सातत्याने पाठपुरावा केला. या गावाला आता 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

आ. रातोळीकरांची तळमळ समाजहिताचा कुठलाही विषय हाती घेतल्यावर त्याचा पाठपुरावा करून त्यात सातत्य ठेवण्याची भूमिका आणि तळमळ असल्यामुळे आ. रातोळीकरांकडे विविध कामे घेऊन येणार्या समस्याग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. आपण ज्या पदावर आहोत, त्या पदाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. मतदारसंघ कोणताही असो, कोणत्याही गाव-खेड्यातील कोणतेही सामाजिक, आरोग्यविषयक, धार्मिक अथवा शैक्षणिक कामे असोत ते पूर्ण करण्यासाठी आ. रातोळीकर शासनस्तरावर प्राधान्य देतात, याचे अनेक उदाहरणे आहेत. हणेगावच्या रुग्णालयाचा प्रश्न सोडवून त्यांनी ग्रामस्थ आणि रुग्णांप्रती दाखवलेली सद्भावना उल्लेखनिय आहे.

नवीन रुग्णालयासाठी प्रयत्न करणार-आ. रातोळीकर
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. ग्रामीण रुग्णांची समस्या गंभीर असून त्यांना वेळेवर उपचार मिळावेत हे महायुती शासनाचे मुख्य धोरण राहिले आहे. यापुढेही आरोग्य सुविधांसाठी आपले प्रयत्न सुरुच राहतील.केवळ हणेगावचाच प्रश्न नाही, तर जिथे रुग्णालयाची आवश्यकता आहे, तिथे नवीन रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया आ. राम पाटील रातोळीकर यांनी दिली.
आमच्या हक्काचा माणूस – फडणवीस
विधान परिषदेचा कार्यकाळ संपलेल्या आमदारांना निरोप देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आ. राम पाटील रातोळीकरांनी आजपर्यंत केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना त्यांनी केलेले कार्य भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीसाठी अत्यंत मोलाचे ठरल्याचा उल्लेख केला. रातोळी गावचे सरपंच ते आमदार अशा त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी केवळ समाजहितासाठीच काम केले आहे.
शिवाय विविध सहकार व शैक्षणिक संस्थांमध्ये काम केले आहे. भाजपचा कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदावर काम करून त्यांनी पक्षाला एक मजबूत संघटन मिळवून दिले. त्यांच्याकडे आम्ही एक हक्काचा माणूस म्हणून पाहतो. एवढेच नव्हे तर एक प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ते परिचित आहेत.त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनसामान्यांची सेवा करण्याचाच प्रयत्न केला, अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.