नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन अनपेक्षित नसले तरी दुःखदायक निश्चित आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक मृदुभाषी, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न राजकारणी आपल्यातून गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील जी राजकारणातील परंपरागत घराणी आहेत त्यातील बळवंतराव चव्हाणांच्या घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे वसंतराव सत्तेच्या परिघात वावरत असतानाही कधी घमेंडी झाले नाही की कधी त्यांनी उद्धटपणा दाखविला नाही. ज्या काळात त्यांची पक्षाला अत्यंत गरज होती त्या काळात त्यांना नियतीने हिरावून नेले हे अत्यंत दुर्देवी आहे.
नायगाव सारख्या अत्यंत ग्रामीण भागात आपली राजकीय कारकिर्द सुरु करणारे वसंतराव सलग २४ वर्षे नायगावचे सरपंच होते. बळवंतराव चव्हाण आमदार असल्याने राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. परंतु केवळ राजकीय वारसाच्या बळावर त्यांनी आपली कारकिर्द पुढे नेली नाही तर जनसामान्यात वावरत असताना लोकांच्या काय गरजा आहेत, आपल्या भागासाठी काय केले पाहिजेत याचा अभ्यास करुन त्यांनी नायगावला पुढे नेण्याचे काम केले. नायगाव सारख्या छोटाश्या गावात कृषी महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, डी.फार्म, बी. फार्म, बी.एड्. काँलेज, आयटीआय आदि शिक्षणाच्या सोयी करुन त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची दारे खुली करुन दिली. स्वतः वाणिज्य पदवीधर असल्याने शिक्षणाचे काय महत्व आहे याची त्यांना जाणीव होती. परंतु त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असे की, त्यांनी स्वतः केलेल्या कामाचा कधी गवगवा केला नाही. वसंतराव पूर्वाश्रमी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे होते. २००८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्या ऐवजी बापूसाहेब गोरठेकरांना उमेदवारी दिली. त्यावेळी वसंतरावांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. २००८ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. एवढेच नव्हे तर अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची संयुक्त सभा नायगावात झाली. स्वतः बापूसाहेब गोरठेकरही अत्यंत प्रबळ उमेदवार होते. ते स्वतः आमदार होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिलेले होते. अशा वेळी वसंतरावांचा अपक्ष म्हणून त्यांच्या समोर निभाव लागणार नाही असा सर्वांचाच कयास होता. परंतु परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही वसंतरावांनी अपक्ष म्हणून ती निवडणूक लढविली आणि जिंकलीही. यावरुन या माणसाची नाळ जनसामान्यांशी किती जोडलेली हे दिसून आले. त्यानंतर मोदी लाटेतही ते आमदार म्हणून निवडून आले.
नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला मानला जातो. मोदी लाटेत संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली असताना नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. अशोक चव्हाण म्हणजेच जिल्ह्यातील काँग्रेस अशी सर्वत्र वदंता होती. ज्यावेळी अशोक चव्हाणांनी काँग्रेसशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस संपली अशीच सर्वाची धारणा झाली. मोदींची दहा वर्षाची कारकिर्द, भाजपाची संघटनात्मक बांधणी आणि अशोक चव्हाणांसारखा मातब्बर नेता पक्षातून गेलेला असताना गलितगात्र झालेली काँग्रेस लोकसभा निवडणुकीत कशी टिकेल अशी सर्वाना चिंता होती. परंतु ते आव्हान वसंतरावांनी पेलले. आपल्या दोन्ही किडण्या निकामी झालेल्या असताना, डायलिसीस सुरु असताना वसंतराव निवडणुकीच्या रिंगणात उतरले. प्रकृतीच्या कारणाने त्यांना निट प्रचारही करता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहासह भाजपाचे अनेक मंत्री, आमदार त्यांच्या पराभवासाठी झटले परंतु दुखणे बाजुला ठेऊन वसंतराव रिंगणात षड्डू ठोकून उभे राहिले आणि भाजपाच्या विद्यमान खासदाराचा पराभव करुन थेट नव्या संसदेत पोहोचले. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचा काँग्रेसचा एकही नेता त्यांच्या प्रचाराला आला नाही. त्याची खंत न करता वसंतरावांनी विजय खेचून आणला. २००८ मधील विधान सभा निवडणूक असो की, २०२४ ची लोकसभा निवडणूक असो वसंतरावांना दोन्ही निवडणुका प्रतिकूल परिस्थितीतच लढवाव्या लागल्या. आणि दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजयही खेचून आणला.
परंतु लोकसभा निवडणुकीतील विजयाची फळ त्यांना फार काळ चाखता आली नाही. अवघ्या दोन-तीन महिन्यातच नियतीने त्यांना हिरावून नेले. लोकसभा निवडणुकीत त्यांचे प्रकृतीकडे झालेले दुर्लक्ष त्यांना भोवले की काय अशी शंका मनाला चाटून जाते. जर त्यांनी लोकसभा निवडणूक न लढविता प्रकृतीकडे लक्ष दिले असते तर अजून काही वर्षे त्यांना आयुष्य लाभले असते. परंतु शेवटी जन्म मृत्युचा खेळ माणसाच्या हातात नाही. हे सर्व विधीलिखित असते आणि ते अटळ असते. परंतु त्यांच्या जाण्याने एक अत्यंत चांगला माणूस आपल्यातून गेला. आज राजकारण इतके गलिच्छ झाले आहे की, जनसामान्याला त्याचा ऊबघ आला. परंतु अशाही वातावरणात वसंतरावांसारखी चांगल्या चारित्र्याची काही माणसे आहेत ज्यांच्यामुळे राजकारणात अजूनही काही आशेचा किरण दिसतो. वसंतराव चव्हाण त्या परंपरेतील नेता होते. विधान परिषद सदस्य, दोन वेळा विधान सभा सदस्य आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थात प्रदीर्घ काळ काम केल्यानंतरही त्यांच्या चारित्र्यावर व चरित्रावर कोणताही डाग पडला नाही हीच त्यांची खरी कमाई आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्युचे दुःख अधिक आहेत. कारण अशी माणसं राजकारणात दुर्मिळ होत चाललीत. वसंतराव त्यामुळेच प्रदीर्घकाळ सर्वाच्या स्मरणात राहतील.
लेखक….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड