नांदेड| कोणत्याही धार्मिक कार्यात अडचणी येतात म्हणजे परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे, हे निश्चित मानले पाहिजे, जेव्हा ईश्वर आपली परीक्षा घेतो, तेव्हा आपण प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे, जेवढी प्रतीक्षा तेवढेच चांगले फळ ईश्वर आपल्या भक्तांना प्रदान करतो, आलेल्या संकटांना, दुःख, त्रास आणि परिश्रमांना न घाबरता भोळ्या शंकराची आराधना करीतच रहा, तुम्हाला एक ना एक दिवस शिवकृपा प्राप्त होईल, असा उपदेश परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी रविवारी शिवमहापुराण कथा वाचनात भक्तांना दिला.
शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे रद्द झालेली शिवमहापुराण कथा रविवारी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी ऑनलाईन कथावाचन केले. लाखो भाविकांनी या कथावाचनाचा लाभ घेतला. कथा वाचनाच्या प्रारंभीच पुज्य पंडितजींनी नांदेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कथामंडपात कथा होऊ शकली नसल्याचे सांगून ही अतिवृष्टी म्हणजे भोळ्या शंकराने नांदेडमध्ये होत असलेल्या या कथेचा स्वीकार करून जणुकाही गंगाजलाभिषेकच केल्याचे नमुद केले. अतिवृष्टी म्हणजे शिवमहापुराण कथेसाठी आलेला व्यत्यय नव्हे तर भोलेबाबा प्रसन्न झाल्याचा एक साक्षात्कार म्हणावा लागेल. कथा कथेच्या जागेवर आहे, आपण विश्वकल्याणाचा विचार केला पाहिजे, अशा परिस्थितीला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणेच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मनुष्य धन-संपत्ती, वैभव, ऐश्वर्य आदींचा संचय करण्यात दिवसरात्र व्यस्त असतो, परंतु शेवटच्या घटकेत त्याला स्वतःच्या वैभवाचा, धनसंपत्तीचा उपयोग स्वतःसाठी करता येत नाही, त्याने जमवलेल्या पैशाचा उपयोग कसा करायचा याचा निर्णय दुसराच घेतो, त्यामुळे आपल्या धनसंपत्तीचा, वैभवाचा सदुपयोग स्वतः करायला शिका, दुसर्याच्या हाती हा निर्णय देवू नका, दुःख भोगत जीवन न जकता सुख-समाधान प्राप्त करून जीवनाचे सार्थक करा, असाही उपदेश त्यांनी केला.
मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना उच्चशिक्षण द्या, मुलांसाठी आपण काय केले? किती धन-संपत्ती जमा केली, किती पैसा खर्च केला, याबाबत वारंवार मुलांना टोमणे न मारता त्यांना चांग्लया संस्काराच्या माध्यमातून या सर्व बाबी समजावून सांगा, मुलांना माता-पित्याबद्दल अभिमान वाटेल, असे संस्कार करा, असे सांगून पंडितजी म्हणाले, कोणत्याही धार्मिक कार्यात अडथळे न आणता असे धार्मिक कार्य यशस्वी होण्यासाठी पुढाकार घ्या, तुम्ही अडथळे आणाल तर भोळे शंकर तुमच्या आयुष्यात नक्कीच अडथळे आणतील, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे.