लोहा। लोहा विधानसभा मतदार संघात ३३ नामनिर्देशन पत्र वैद्य ठरले होते.त्यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी १७ अर्ज मागे घेण्यात आले आहेत त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात १४ उमेदवार राहिले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली.
लोहा विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन मागे घेण्याचा आज सोमवार ४ नोव्हेंबर शेवटचा दिवस होता निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या समक्ष उमेदवारी मागे घेण्यात आली दुपारी तीन नंतर उमेदवार याना चिन्ह वाटप करण्यात आले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी तर त्यापूर्वी दोघे असे एकूण १९ जणांनी उमेदवारी मागे घेतली .यात विद्यमान आ. श्यामसुंदर शिंदे, महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक माजी आ शंकरअण्णा धोंडगे, प्रा पुरुषोत्तम धोंडगे , काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ , लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर, मोहनराव शिरसाट, विठ्ठल उतम जाधव, विठ्ठल परसराम कदम, संजय चांदू भालेराव, बाबर रामेश्वर बालासाहेब , मनिषा पुरुषोत्तम धोंडगे, गोदावरी विनायक लोहकरें, पंकज गोपाळराव वाखरडकर, बालाजी सोपान हालगे, भारत बाबाराव कोपनर, मेहरबान मोतीराम जाधव, सुरेश दिगंबर कांबळे, सुरेश सुधाकर घोरबांड , प्रताप गोविंदराव पाटील या १९ जणांनी उमेदवारी मागे घेतली.
रिंगणात राहिलेले उमेदवार पक्ष व चिन्ह हे पुढील प्रमाणे आहेत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (घड्याळ), एकनाथ पवार शिवसेना उबाठा (मशाल ) आशाताई श्यामसुंदर. शिंदे (पिझंटस अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (शिट्टी) चंद्रसेन इश्वर पाटील (जनहित लोकशाही पार्टी (बॅट), शिवकुमार नारायण नरंगले- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर) सुभाष भगवान कोल्हे (संभाजी ब्रिगेड पार्ट – शिवणयंत्र) आशा श्यामसुंदर शिंदे (अपक्ष – ट्रक ), एकनाथ जयराम पवार (अपक्ष – चिमणी) प्रकाश दिंगबर भगनुरे (अपक्ष – सफरचंद) बालाजी रामप्रसाद चुकलवाड (अपक्ष- अंगठी ) पंडित सुदाम वाघमारे (अपक्ष -कपाट), प्रा मनोहर धोंडे (अपक्ष-प्रेशर कुकर), सुरेश प्रकाशराव मोरे ( अपक्ष- आटो रिक्षा), संभाजी गोविद पवळे (अपक्ष -फुगा) या उमेदवारात लढत होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी निवडणूक चिन्ह वाटप केले सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार परळीकर, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, सहायक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यासह निवडणूक निरीक्षक पल्लवी अकुरती याची विशेष उपस्थिती होती.
निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी उमेदवार श्री चंद्रसेन ईश्वर पाटील यांना एअरकंडिशनर हे चिन्ह सुचवले होते, परंतु ते ग्रामीण मतदारांना कळणार नाही म्हणून बॅट या चिन्हाची मागणी केली ते त्यांना देण्यात आले. प्रा मनोहर बाबाराव धोंडे यांना बेबी वॉकर हे चिन्ह निवडणूक अधिकारी यांनी सुचवले होते परंतु त्यांनी प्रेशर कुकर हे चिन्ह देण्याची मागणी चिन्ह वाटपचे वेळी केली असल्याने त्यांना प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले या प्रक्रियेदरम्यान आयोगाचे निवडणूक निरीक्षक पल्लवी आकुरथी उपस्थित होत्या.
निवडणूक निरीक्षक यांनी घेतली उमेदवारांची बैठक ; सविस्तर सूचना
सर्व उमेदवार यांनी दर तीन दिवसाला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे.आदर्श आचारसंहिता पालन करणे आवश्यक असून जर भंग झाला तर आपणांस अँप द्वारे तक्रार नोंदविता येईल यात civigil अँप ची माहिती दिली, esms अँप ची माहिती दिली तसेच मतदारांना प्रलोभन न दाखवता प्रचार करण्याचे आवाहन केले , सुविधा अँप वर विविध आवश्यक त्या परवानगी ची मागणी करून त्या एक खिडकी मधून घेता येतील, Worry लिस्ट संदर्भात त्यांनी उमेदवारांशी चर्चा केली.