हिमायतनगर। मागील ७० वर्षांपासून रहिवासी असल्याने तत्कालीन ग्रामपंचायत व आत्ताची नगरपंचायत लाईट बील, नळ पट्टी आणि सर्व कर वसूल करते. परंतु घरटॅक्स पावती देत नाही यामुळे हिमायतनगर प्रकरण गंभीर असून, मंगळवार ता.१७ डिसेंबर पासून सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली १५६ पीडितांनी जिल्हाधिकारी नांदेड येथे आमरण उपोषणास सुरवात केली आहे.
हिमायतनगर ग्रामपंचायत असताना ७० वर्षांपूर्वी तेथील अनेक नागरिकांना घरभाडे तत्वावर राहण्यासाठी जमीन देण्यात आली आहे. आताची नगर पंचायत घरभाडे, नळपट्टी आणि इतर कर नित्यनियमाने वसूल करीत आहे. सर्वांना विद्युत मीटर देखील मिळाले आहेत परंतु मालकी हक्क प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. ही खुपच गंभीर बाब आहे.
हिमायतनगर वाशीय मागील सात दशकापासून राहतो ते घर नावावर व्हावे म्हणून झगडत आहेत. ही स्वतंत्र भारतातील शोकांतिकाच म्हणावी लागेल.स्वातंत्र्याचा ७७ वर्धापन दिवस आपण साजरा केलाय आणि पीडिताना लहान लेकरा बाळासह आमरण उपोषणास बसावे लागते हे न परवडणारे आहे. एकीकडे शासकीय जमीन आणि मोकळे भूकंड लाटण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु असून हिमायतनगर येथील पीडित मात्र घर नावावर व्हावे अर्थातच नमुना नंबर ४३प्रमाणे मालकी हक्क प्रमाणपत्र मिळावे म्हणून संघर्षशील लढा देतांना दिसत आहे.
यापूर्वी तहसील आणि नगर पंचायत वर अनेक लक्षवेधी आंदोलने करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक आश्वासने देऊन वेळ मारून नेली आहे. मागील काही वर्षांपासून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि लोकविकास संघर्ष समितीच्या संयुक्त नेतृत्वाखाली शासनाच्या विविध कार्यालयावर उपोषणे मोर्चे काढून सनदशीर मार्गाने लढा देने सुरु आहे.
रास्त मागण्या असूनही सरकार आणि शासनाच्या वतीने दखल घेण्यात येत नसल्याने निर्वांनीचा इशारा म्हणून १७ डिसेंबर रोज मंगळवार पासून पीडितांचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री गंगाधर इरलोड यांना शिष्टमंडळ भेटले असून,त्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या भव्य आमरण उपोषणाचे नेतृत्व कॉ.दिगंबर काळे,जयश्री बीजेवार, गणेश रचेवार, नवीन कुमार मादसवार, गंगाधर गायके, परमेश्वर सूर्यवंशी, कांताबाई बनसोडे आदिजन करीत आहेत.
हे आंदोलन लोकविकास संघर्ष समितीचे मुख्य प्रवर्तक कॉ.विजय गाभने, सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले असून वरिष्ठानी तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीने मागण्या सोडवाव्यात असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. सवेधानिक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेण्यात येत नाही या बद्दल कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रशासनाची नाराजी व्यक्त केली आहे. अशी माहिती सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.