श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। आगीच्या तांडवामुळे माहूर तालुक्यातील मेंडकी वन परिमंडळात लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे.या जंगलाला लागणारा वनवा नित्याची बाब झाली आहे.तरीही वन विभागाचे धोरण दुर्लक्षित आहे.त्याच्या या भूमिकेविषयी वणप्रेमी नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.


माहूर परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मेंढकी वन परिमंडळातील मेंडकी, वानोळा शिवारात दि.१५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान जंगल शिवार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले . वानोळा, मेंडकी जंगल शिवारात १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वनवा सुरूच होता. या आगीने अंदाजे ७० हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. यात मौल्यवान वन औषधी सह सागवान वृक्ष जळून खाक झाले आहे.गोंडवडसा, मांडवा परिमंडळातील पानोळा, मांडवा परिसरातील जंगलाला सुद्धा आठ दिवसापूर्वी आग लागल्याने वनसंपदा नष्ट झाली. ही आग लागली की लावली गेली हा विषय संशोधनाचा ठरत आहे.? जंगलाच्या संरक्षनाची जबाबदारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे असताना सुद्धा जंगल शिवाराचे मूल्यांकन होण्यापूर्वीच आग लागतेच कशी? फायर लाईन करूनही वनवा लागला कसा? असे प्रश्नही उपस्थित होत आहे.

चौकट…

कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे.

माहूर तालुक्यातील पाच वन परिमंडळातील वनपाल,वनरक्षक हे मुख्यालयी राहत नाही.वास्तविक वन यंत्रणेकडे शेकडो हेक्टर जंगल क्षेत्राच्या संवर्धन आणि सुरक्षिततेची जबाबदारी आहे.यासाठी शासनही गंभीर आहे.मात्र माहूर तालुक्यातील वन परिमंडळातील वनकर्मचारी याविषयी गंभीर नाही. येथील कार्यरत वनकर्मचारी हे मुख्यालयाला दांडी मारून माहूर, वाई बाजार येथून अप-डाऊन करून आपले कर्तव्य बजावत आहेत. शेकडो हेक्टर जंगल गस्ती अभावी तस्करांच्या हवाली आहे.आगीच्या घटनेलाही याच बाबी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनपाल, वनरक्षकांवर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा चे माजी तालुकाध्यक्ष अँड. दिनेश येऊतकर यांनी केली आहे.