किंनवट, परमेश्वर पेशवे| सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यावर्षीची विधानसभा निवडणूक ही विशेष ठरणार आहे. गेल्या दोन वर्षाचे राजकारण पाहता मतदारांमध्ये पूरता गोंधळ उडालेला दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून विद्यमान सरकार स्थापन झाले होते. विद्यमान सरकार स्थापन होताना पक्ष फुटी मोठ्या प्रमाणात झाली या फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका सर्वच मुख्य पक्षांना बसलेला दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे ही फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले दिसून येत नाही. यामुळे जनता निश्चित कोण कोणाच्या बाजूने देईल हे सांगता येणार नाही. त्यातच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण व धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकारला योग्य निर्णय घेता आलेला दिसून येत नाही.
अशातच मराठा व ओबीसी संघर्ष पराकोटीला गेलेला दिसून येत आहे. याचाही फटका नेमका कोणाला बसेल हे निश्चित सांगता येणार नाही. एक मात्र खरं या सर्व गोंधळामुळे इच्छुक उमेदवारांची भुंबेरी उडालेली दिसून येत आहे. यालाच किनवट/माहूर मतदार संघ ही अपवाद नाही. या मतदार संघांमध्ये आदिवासी बंजारा आणि इतर जात समूह त्यांचा पगडा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसे पाहिले तर जात फॅक्टर प्रभावी करताना दिसत आहे. विद्यमान आमदार मा. भिमराव केराम हे आदिवासी समाजातुन येतात. तेवढाच ताकतीचा बंजारा समाज ही या मतदारसंघांमध्ये वास्तव्याला आहे. त्यामुळे सहाजिकच आपल्या समाजाचा नेता आमदार व्हावा ही इच्छा सर्व स्तरातून बोलली जात आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी दिली तरी भारतीय जनता पक्षामध्ये प्रफुल्ल राठोड, संध्याताई राठोड, सचिन नाईक, धरमसिंग राठोड या नेत्यांनाही उमेदवारीचे वेध लागले होते. परंतु यांच्या पदरी निराशाच पडली. साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही हे सर्व इच्छुक पक्षाच्या कार्यप्रणाली वर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच बंडाची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच हा कार्यकर्ता कसा गाडीमध्ये ही सर्व काही अलबेल आहे असे चित्र दिसत नाही. एकीकडे महा विकास आघाडीने प्रदीप नाईक यांना उमेदवारी घोषित केली. व त्याच ताकतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली व सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्हिटीज वाढवल्या व आपण कसे सरस व प्रभावी आहे हे दाखवण्याचा मतदारांना प्रयत्न चालू केला .तर इकडे उबाठा शिवसेनेचे ज्योतिबा खराटे हे इच्छुक होते. त्यांच्याही पदरी घोर निराशा पडली. त्यामुळे ज्योतिबा खराटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटल्याचे चित्र आहे. त्यातच अपक्ष उभे राहण्याची संकेत त्यांनी दिले असल्याने आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमातच आहेत.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने प्राध्यापक विजय खूपसे यांना उमेदवारी देऊन किनवट/माहूर मतदार संघामध्ये चुरस निर्माण केली होती . पण अचानक प्राध्यापक विजय खुपसे यांची उमेदवारी वंचितने बदलून राजकारणात नवीन असलेले डॉक्टर व्यवसायात पुंडलिक आमले यांना दिली. प्रामुख्याने प्राध्यापक असलेले विजय खुपसे हे आदिवासी समाजात प्रभावी उमेदवार म्हणून बघितले जात होते. आदिवासी समाजासह इतर समाजात हि त्यांचे प्रभुत्व होते. या बाबीची धसकी भाजपानेही घेतली होती. कारण त्यांचा जनसंपर्क हा दांडगा होता.पण अचानक उमेदवारी बदलल्याने व वंचित बहुजन आघाडीने नवीन चेहरा जनतेसमोर आल्याने आज घडीला या मतदारसंघांमध्ये एक वेगळे वातावरण बघायला मिळत आहे. म्हणणे काही वावगे ठरणार नाही या मतदारसंघातील मतदार प्राध्यापक विजय खुपसे यांच्याकडे तिसरा पर्याय म्हणून पाहत होते.
यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार हे निश्चित झाले आहे. इच्छुकांच्या या मांदियाळी मध्ये कोणाला जनता आपला कौल देईल. हे सांगणे आता तरी कठीण झाले आहे. तरी किनवट/माहूर मतदार संघामध्ये महायुतीचे भीमराव केराम, महाविकास आघाडी तर्फे प्रदीप नाईक वंचित बहुजन आघाडीचे पुंडलिक आमले , प्राध्यापक विजय खुपसे यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने चुरशीची चौरंगी लढत व अपक्ष सचिन नाईक यांच्यात लढत होईल असे बोलल्या जात आहे. जनता कोणाला कौल देईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.