नांदेड| विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयाच्या सहवासात असतात. त्यामुळे विद्यार्थी व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. अभ्यासासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी विद्यार्थी ग्रंथपाल, ग्रंथालयाशी आपुलकीचे, स्नेहाचे नाते जोडतात. ग्रंथपाल व ग्रंथालयीन कर्मच्यारीही विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण प्रगतीत मदत करतात. विद्यार्थी व कर्मचारी यांच्यात सतत संवाद असतो. त्यातून विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे अतूट नाते निर्माण होते असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, भूशास्त्र संकुलाचे संचालक तथा ज्ञान स्रोत समितीचे सदस्य डॉ. अविनाश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कुलगुरू व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे चंदनहार तर डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा परिचय करून देत कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद केली. ज्ञान स्रोत केंद्रातील कर्मचारी कु. पूजा भुसारे या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा कुलगुरू व मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने ज्ञानस्रोत केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन कुलगुरू महोदयांनी शुभेच्छा दिल्या.
कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी ते महाविद्यालयात कार्यरत असताना ग्रंथालय विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केल्याचे सांगितले. आपले ग्रंथालय समृद्ध असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. डॉ. अविनाश कदम यांनी त्यांच्या वाचनविषयक कवितेतील काव्यपंक्ती ऐकवून ज्ञान स्रोत केंद्राच्या कार्याचा गौरव केला. ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच विद्यापीठ, ग्रंथसंपदा, विशेषांक, विद्यापीठातून सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-याविषयी सातत्याने वर्तमानपत्रातून सकारात्मक लेखन करतात हे कौतुकास्पद आहे असे विचार त्यांनी मांडले.
कुलगुर डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थी आणि ग्रंथालयाचे नाते अतूट असते असे सांगतानाच विद्यापीठ परिसरातील १०२ विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या या यशामागे निश्चितच ग्रंथालयाचेही महत्वाचे योगदान असल्याचे नमूद केले. ज्ञान स्रोत केंद्राच्या अभ्यासिकेत अभ्यास करून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्राने डिजिटलायझेशन मध्ये भरीव प्रगती केली आहे. वेब ओपॅकमुळे ग्रंथालयातील ग्रंथ संपदेची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध झाली आहे. ज्ञान स्रोत केंद्राचा परिसर सदैव स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येत असल्याचे माझे निरीक्षण आहे. ज्ञान स्रोत केंद्राने विद्यार्थी हिताच्या दृष्टीने चांगले नवनवीन उपक्रम राबवावेत. ज्ञान स्रोत केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक वाढवा, त्यांना विविध जबाबदा-या दिल्या तर ते त्यातून ते शिकतील, प्रगती करतील अशी भूमिका मांडली.
आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन ज्ञान स्रोत केंद्राने आपले व्हिजन आणि मिशन मध्ये आवश्यक बदल केले पाहिजेत. ई-कंटेंट, ॲडिओ स्वरूपातील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी विविध प्रगत ग्रंथालयांना भेटी देऊन कामकाजाची पद्धत समजून घेतली पाहिजे, त्या प्रगत ग्रंथालायातील चांगल्या बाबी आपणही आत्मसात केल्या पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले तर आभार विठ्ठल मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. राजेश काळे, गणेश लाठकर, डॉ. अरुण हंबर्डे, संदीप डहाळे, खाजामिया सिद्दिकी, मोहनसिंग पुजारी, माधव लुटे, कु. पूजा भुसारे, कु. प्रेमीला बडगे, दयानंद पोपळे, तिरुपती हंबर्डे, योगेश हंबर्डे, संजय करडे यांनी प्रयत्न केले. यावेळी सुरक्षा पर्यवेक्षक गोविंद हंबर्डे यांच्यासह इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.