बिलोली। हैदराबाद मुक्तिसंग्रामातील महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की, हा लढा सुट्या- सुट्या पद्धतीने लढल्या गेला. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बँक लूट प्रकरणानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील योद्धांना अपराधी ठरविण्यात येत असल्याकारणाने, यातील योद्धांनी आपली कामगिरी न सांगता मौन धारण करणे योग्य समजले. यामुळे या लढ्यातील अनेक महत्त्वपूर्ण स्वातंत्र्य सैनिक अज्ञात राहिले. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देशमुख यांनी केले.


ते अर्जापूर ( ता. बिलोली ) येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. दिनांक 30 जानेवारी अर्जापूर येथील कै.जयराम अंबेकर विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिनाचे पुण्यस्मरण याचे औचित्य साधून ” गाथा हैदराबाद मुक्तिसंग्रामाची ” याबाबत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरभारती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गंगाधररावजी पटणे होते तर प्रमुख व्याख्याते तात्यासाहेब देशमुख हे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा प्रमुख समन्वयक प्रश्न सिमावर्ती भागाचे..! श्री गोविंद मुंडकर, पानसरे महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा.डॉ.गोपाळ चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकट पांडवे, गंगाधर कल्याणकर बिलोली,देगलूर महाविद्यालय देगलूरचे निवृत्त प्राध्यापक बाबुराव उप्पलवार ,बिलोलीचे माधव फुलारी, प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष देगलूरकर यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.

तात्यासाहेब पुढे म्हणाले की, हैदराबाद मुक्ति संग्रामासाठी लढलेल्या हुतात्म्यांच्या आठवणीसाठी, मराठवाड्यात 71 हुतात्मा स्मारके आहेत. जवळपास सर्व हुतात्मा स्मारकांच्या परिसरात 17 सप्टेंबर 1998 ते 2 ऑक्टोंबर 1998 या काळात सभा घेऊन, जागर यात्रा काढण्यात आली. या यात्रेतील तीन संयोजका पैकी मी एक संयोजक होतो. गोविंदराव मुंडकर यांच्या वडिलाप्रमाणे माझे वडील चळवळीतील स्वातंत्र्य योध्ये होते. पी व्ही नरसिंहराव सरकारने या लढ्याला स्वातंत्र्याचा लढा म्हणून घोषित केले होते. याचा आम्हाला मनस्वी आनंद झाला. हुतात्म्यांच्या कार्याला, त्यांच्या बलिदानाला मोठ्या कालखंडानंतर न्याय मिळाल्यामुळे, अशा विषयाच्या अनुषंगाने आमच्या तीन संस्था एकत्र येऊन ही यात्रा काढली होती.

तात्यासाहेब देशमुख यांनी रजाकराच्या अत्याचारा विरोधात सर्वच जाती – धर्मातील लोक आपापल्या कुवत क्षमतेप्रमाणे विरोध कसे करत होते. हे स्पष्ट करतानाच, या लढ्यातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे हे होते तर शेवटचे हुतात्मा शोहेबूल्लाह असल्याचे त्यांच्या कार्यासह स्पष्ट केले. मुस्लिम समाजातील शोहेबूल्लाह हे परखड लिखाणाने, पत्रकारितेच्या माध्यमातून निजामाला कसे विरोध केले या व अन्य अनभिज्ञ विषयावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तात्यासाहेब देशमुख यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील आठवणी सांगतानाच निबंध स्पर्धा आयोजित करण्याविषयी सुचवून, पुरस्काराची घोषणा केली. माजी आमदार गंगाधरराव पटणे यांनी म्हाळप्पा पटणे, संतराम कागठीकर यांच्या कार्याविषयी उपस्थितांना जाणीव करून दिली.प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांनी यावेळी स्वच्छता, सत्य , याचे जीवनातील महत्त्व विशद करून सांगितले.
यावेळी गोविंद मुंडकर, वेंकट पांडवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी एक मिनिट स्तब्ध राहून हुतात्म्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. अध्यापक पवार यांनी केले. सौ स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी मोरे,बाळके, भीमराव बडूरकर, बसवंत मुंडकर यासह बिलोली, देगलूर अर्जापूर येथील नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन अध्यापिका मुंगडे यांनी केले. राष्ट्रगीत आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.