श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यातील वाई बाजार येथे भटक्या जनावरे व गांढवाचा वावर वाढला असून कुत्र्यांचा बेफाम वावर ही गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आहे.मुख्य रस्त्यावर तळ ठोकून बसणाऱ्या मोकाट जनावरांसह गाढवे, कुत्री यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु येथील ग्रा.प प्रशासनाकडे कोंडवाड्याची व्यवस्था नसल्याने कारवाई होत नाही. परिणामी अपघात घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न वाईकरांपुढे कायम आहे.
येथील मुख्य रस्ते आणि गल्ली बोळात मोकाट जनावरानंतर आता बाहेर गावातून वाळू वाहून नेणार्या गाढवांचा व कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.सदरील जणावरे इमारतींच्या पार्किंगमध्ये, त्याच प्रमाणे रात्रीच्या वेळेस बंद दुकानांच्या आश्रय हे जणावरे घेत असतात. त्या ठिकाणी कुत्र्यांच्या व इतर जणावरांच्या घाणीने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. हजारोंच्या संख्येने असलेले हे भटके कुत्रे तसेच जणावरे दिवसा वाहतुकीला अडथळा तर आणित आहेतच, रात्रीच्या वेळेस एकट्या दुकट्या दुचाकी स्वाराच्या मागे लागून त्याची त्रेधातिरपीटही उडवत आहेत. अशाच घटनांमध्ये दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन काही लोक जखमी देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक कुत्री जखमी किंवा लूत भरलेली असून त्यामुळे शहरातील नागरीकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला दिसून येत आहे.
वाई बाजार येथे गाढवांवरुन वाळू तस्करी
वाळू माफियांनी तालुक्यातील पैनगंगा नदीची अक्षरशा चाळणी केली होती.परंतु अतिवृष्ठीने ती भरुण निघाली.असे असतांना बाहेर गावातून आलेल्या काही वाळु माफीयांनी वाळू चोरण्यासाठी नामी शक्कल लढवत वाळू तस्करीसाठी थेट गाढवांचा व खच्चर घोड्याचा वापर सुरु केला आहे. यामुळे प्रत्यक्ष कारवाई करताना महसूल प्रशासन चक्रावून गेले आहे.सध्या पैनगंगा नदी पाञात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाळू माफियांनी आपला व्यवसाय थांबून ठेवला आहे.याचाच फायदा घेत काही वाळु माफीयानी चक्क गाढवांद्वारे वाळू तस्करीचा नवा फंडा अमलात आणला असून मोठ्या प्रमाणात वाळु उपसा करीत महसूल प्रशासनाला चुना लावण्याचे काम सध्या वाई बाजार येथे पहावयास मिळत आहे.
मोकाट जनावरांची शेतशिवारात नासधूस; शेतकरी हैराण
वाई बाजार येथे मोकाट जनावारांचा धुमाकूळ सुरू असून, सुमारे ३० ते ४० जनावरांनी गावाला लागून असलेल्या शेती शिवारात जावून नासधूस करीत आहेत. गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती कसली जाते. अशातच मोकाट जनावरांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेतात महागाडे बी-बियाणे टाकून, खते फवारून मारून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने रान हिरवेगार केले आहे.परंतु मोकाट जनावरांच्या त्रासाला बळीराजा कंटाळला असून, हातचे पीक जाते की काय? अशा चिंतेत आहे.