नांदेड l सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.


हे प्रशिक्षण न्यूट्रिशन, स्तनपान, पूरक आहार या विषयावर होत असून चार दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण सहा बॅचेस निवड केलेली असून जवळपास 300 अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहे. प्रशिक्षण दि. 03-04-2025 ते 15 -04 -2025 तारखे पर्यंत असणार आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवा बळकटीकरणांमध्ये माता व बाल आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. माता व बालकाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी आयआयटी बॉम्बे व जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.

जन्मानंतर पहिल्या तासात शिशुच्या आयुष्याची सोनेरी सुरुवात करण्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे. जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे आवश्यक आहे. शिशुला मातेच्या सुरुवातीचे घट्ट पिवळे दूध चिकाचे दूध देणे अतिशय महत्त्वाचे आहे. चिक दूध हे अनेक आजारापासून बाळाचे संरक्षण करते.

स्तनपान हे माता व बाळ यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करते बाळाच्या बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचे ठरते. सामान्य अथवा सिजेरियन दोन्ही प्रकारच्या परिस्थितीनंतर एका तासाच्या आत लवकरात लवकर स्तनपान केले पाहिजे व सहा महिने निव्वळ स्तनपान करणे आवश्यक आहे. पण स्तनपानाच्या काही चुकीच्या पद्धतीने बाळाचे पोषण होत नाही आणि बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होण्यास अडथळे निर्माण होतात.
त्यामुळे मातेचे आणि बाळाचे आरोग्य सुदृढ निरोगी राहण्यासाठी सशक्त बनण्यासाठी पण स्तनपानाच्या योग्य पद्धती समजावून घेऊन त्यावर भर दिला पाहिजे आणि सर्व आरोग्य संस्थेतून त्याचे समुपदेशन झाले पाहिजे तसेच पूरक आहार व न्यूट्रिशन हा विषय प्रशिक्षणार्थी यांनी समजून घेऊन आपल्या संस्थेत व कार्यक्षेत्रात त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि असे केल्यास नांदेड जिल्हा कुपोषित जिल्हा म्हणून ओळखल्या जाईल.
असे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितले. कुपोषित मुक्त नांदेड करण्यासाठी प्रत्येक स्तरावर आशा, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी सर्वांनी याचा प्रसार व प्रचार करून समाजामध्ये स्तनपानाच्या पद्धती समुपदेशनाद्वारे अवगत करून द्यावे कुठल्याही आजारा होण्यापूर्वी प्रतिबंधक उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी स्तनपान पूरक आहार व महत्त्वाचे अन्नघटक यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक डॉ. देवजी पाटील, डॉ.रूपल दलाल, डॉ. सलमा हिराणी होते. हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. संजय पेरके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. शिवशक्ती पवार माता बाल संगोपन अधिकारी व श्री प्रशांत थोरात महिला व बालकल्याण सीईओ व इतर अधिकारी कर्मचारी व जिल्ह्यातील आलेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.