हिमायतनगर, अनिल मादसवार/आनंद मोरे| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी अतिशय बोगस दर्जाचे करण्यात आले होते. त्यामुळेच कि काय..? नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसानं चक्क रस्ता वाहून गेल्याने तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात येणारी वाहतूक खोळंबली आहे. रस्त्याचे काम होताना याबाबत तक्रारी झाल्या असताना देखील राजकीय वरदहस्त आणि अभियंत्याशी मिलीभगत करून ठेकेदाराने कोट्यावधीच्या निधीची विल्हेवाट लावली आहे. अश्या प्रकारे बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि बोगस कामाचे समर्थन करून देयके उचलून देण्यास मदत करणाऱ्या अभियंत्यावर बडतर्फीची कार्यवाही व्हावी अशी मागणी वाशी गावासह या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विकासप्रेमी नागरीकातून केली जात आहे.


सदरचा रस्ता करताना ठेकेदाराने अभियंत्याशी मिलीभगत करून शासनाच्या मुळ अंदाज पत्रकाला बगल देऊन केल्याने डांबरी रस्ता हाताने निघत असून, सिमेंट काँक्रेट रस्त्याला देखील तडे जाऊन अनेक ठिकाणी उखडला आहे. अवघ्या महिन्यातच खचू लागलेल्या या बोगस रास्ताकामाची सखोल चौकशी करून दोषी अभियंते व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी. आणि रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार पुन्हा करून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे यांनी केली आहे. निकृष्ट रस्ता व पुलाच्या कामाच्या चौकशीस विलंब अथवा टाळाटाळ केल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्या देखरेखीखाली हिमायतनगर तालुक्यातील एकघरी फाटा, बिरसा मुंडा चौक ते वाशी अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून जवळपास ५ ते ७ कोटी रूपये निधी मंजूर झाला. या मंजूर निधीतून या अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, सिमेंटीकरण, पुल व पुलमोर्या तसेच साईड पट्ट्या भरणे यासह अन्य कामे अंदाजपत्रकात दिलेल्या नियमानुसार करणे बंधनकारक होते. तसेच कामांच्या ठिकाणी मंजूरी फलक लावणे अनिवार्य असताना हदगाव तालुक्यातून राजकीय वरहस्ताने ठेका घेतलेल्या ठेकेदार यांनी फलक तर लावलेच नाही. जुना उखडलेला डांबरीकरण रस्ता उखरूण मजबुतीकरण करावयाचे असताना ठेकेदार यांनी पहिल्याच रस्त्यावर दोन इंच डांबरीकरणाचा लेयर टाकून हा रस्ता थातुर माथूर पद्धतीने पुर्ण केला आहे.

सदर कामामध्ये कमी मटेरियलचा वापर करूण शासनाच्या मुळ अंदाज पत्रकाला बगल देऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. असेच गावापासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्यावर मिनी पुला उखडून नवीन पुलमोर्या उभारणे गरजेचे असताना पहिलेच पाईप टाकलेल्या पूल कायम ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात या पुलावरील नव्याने करण्यात आलेला डांबरी रस्ता वाहून जाण्याची भीती जून महिन्यात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे यांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त करून या बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरनाचे काम करताना हवा त्या प्रमाणात डांबर वापरण्यात आला नसल्याने रस्त्याचे काम अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे झाले असा आरोप सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार देऊन केली होती.

तक्रार दिल्यानंतर देखील शाखा अभियंता व तसेच हिमायतनगर येथील उपअभियंता यांनी सुधारित पद्धतीने मूल्यांकन करून ठेकेदारास बोगस बिले देऊन शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. या रस्त्याच्या कामास अवघे चार महिने उलटले नसताना नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे बिरसा मुंडे चौक ते वाशी रस्त्यावरील मिनी पुलावरील डांबरीकरण केलेला रास्ता वाहून गेला आहे. त्यामुळे ठेकेदार व अभियंत्याच्या मिलीभगतने सरसम जिल्हा परिषद गटात झालेल्या कोट्यवधींच्या बोगस रस्ता कामाचे पितळे उघडे पडले असून, या रस्ता व पुलाच्या कामाची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करून संबंधी गुत्तेदार व एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून बोगस कामाचे समर्थन करणाऱ्या अभियंत्यावर बडतर्फीची कार्यवाही करावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. तक्रार दिल्यानंतर देखील बोगस काम करणाऱ्या एजन्सीवर कार्यवाही का..? केली गेली नाही असा सवाल भाजपचे दत्ताभाऊ शिराणे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. आतातर रस्ता वाहून गेला त्यामुळे या निकृष्ट रस्ता व पुलाच्या कामाच्या चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करावं लागेल असा इशारा दत्ता शिराणे व या रस्त्याने ये-जा करणाऱ्या अनेक विकासप्रेमी नागरिकांनी दिला आहे.