हदगाव, शेख चांदपाशा| नांदेड, यवतमाळ जिल्ह्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे कवाना येथे श्रीसंत नंदी महाराज (Sreesanth Nandi Maharaj Yatra) यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो वर्षांच्या पंरपरेपासुन चालू असलेल्या यात्रेला यंदा दिनांक १८ पासून शानदारपणे सुरवात झाली आहे. सामाजिक, धार्मिक, एकात्मतेचे प्रतीक असलेल्या यात्रेत विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहेत. दिनांक १२ जानेवारी रोजी सप्ताहाने सुरुवात झाली असून, दररोज भजन, किर्तन, अन्नदान होत आहेत. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, या धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


सणात समागमे धारावी आवडी… करावी तातडी परमार्थाची… पाय तुमचे गुरु राजा… माझी देव पुजा हो शिवपुजा… या नामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात संत नंदी महाराज संस्थान तीर्थक्षेत्र कवाना येथे पुण्यतिथी सोहळा आणि यात्रा महोत्सवाला दिण्णक १२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दिनांक १८ शनिवार रोजी १०४ व्या वर्ष पुण्यतिथीनिमित्त श्रींचा अभिषेक महापुजा मिरवणूकीसह महाप्रसाद संपन्न झाला असून, रविवार रोजी रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. काशिनाथ महाराज माने परभणीकर यांच्या मधुर वाणीतून किर्तन संपन्न झाले आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील नामांकित गुरुवर्याची यांनी उपस्थिती लावली होती.

यात्रेदरम्यान विविध स्पर्धेला राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मंडळीच्या योगदानासह उपस्थिती आणि बक्षीसही ठेवण्यात आले आहेत. भव्य राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धा दि.२० सोमवारी रोजी होणार असून, खा. नागेश आष्टीकर, माजी आ. माधवराव जवळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. दि.२१ मंगळवार रोजी राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा आणि बुधवारी दि.२२ प्राथमिक व इंग्लिश स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तर गुरुवारी दि. २३ रोजी माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेला आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. हेमंत पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाला यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेला राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनीधींसह तालुका, जिल्हा, प्रशासनासह सामाजिक, धार्मिक, मंडळीची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेतील सर्व संघास स्व.व्यंकटराव तुकाराम सादूलवार यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सादूलवार परिवार कवाना तर्फे बक्षीदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत जास्त संघानी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजन समिती यात्रा कमिटीने केले आहे. एक आठवडाभर चालणाऱ्या विविध स्पर्धेत यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील मंडळीसह, लेकीबाळी उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त होणारे सर्व कार्यक्रमासाठी मंदिर समिती समस्त गावकरी मंडळीसह परीसरातील विविध क्षेत्रातील मंडळी परीश्रम घेत आहेत. यात्रेची गर्दी लक्षात घेऊन मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, उपनिरीक्षक भुषण कांबळे, बिट जमादार श्याम वडजे यांच्यासह मनाठा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
