हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर शहरातील श्री परमेश्वर मंदिरापासून सघोष पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. यात मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात सकाळी ०८ वाजता प्रथम वाद्याच्या गजरात रंगीत तालीम घेण्यात आली. यानंतर प्रार्थना होऊन पथसंचालनाची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. गावातील महिलांनी सकाळी सडा – सारवान व रांगोळी काढून पथसंचालनाच्या स्वागताची तयारी केली होती. शोभायात्रेत युवकांनी संघाचे गणवेश धारण करून हाथी भगवा ध्वज व लाठी धरून सघोष शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन शहरातील मुख्य रस्त्याने केले.
संचालनानंतर श्री परमेश्वर मंदिरात डॉ हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि शस्त्राचे पूजन करन्यात आले. प्रांत संघटन मंत्री व मान्यवरांचे बौद्धिक भाषण झाले. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी स्वतः आणि सहकार्यांना घेऊन उपस्थित होऊन बंदोबस्त लावला.