हिमायतनगर| वडीगोद्री, अंतरवाली सराटी, नांदेड आय. टी. आय. कॉर्नर येथे ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी सुरु केलेले ओ.बी.सी. आरक्षण मागणीचे उपोषण २४ तासाच्या आत सोडविण्यात यावे. अन्यथा उपोषण सोडविण्याच्या मागणीसाठी दि. २६ गुरुवारी सकल ओ.बी.सी. समाजाकडून हिमायतनगर शहराजवळील मुख्य कमानीजवळ रस्ता रोका आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शासनाने सुरु केलेले ओ.बी.सी. व मराठा समाजातील आरक्षणा वरील वाद त्वरीत संपुष्ठात आणावा. शासनानाने सुरू केलेला ओ.बी.सी व मराठा समाजातील वाद-विवाद संघर्ष त्वरीत थांबवून आरक्षणाचा निकाल ओ.बी.सी.चे आरक्षण अबाधित ठेवून सोडविण्यात यावा. ओ.बी.सी.मध्ये इतर समाजाची होत असलेली घुसखोरी थांबवावी. वडीगोद्री येथे ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे अंतरवाली सराटी अॅड. मंगेश ससाने, संतोष विरकर, बाळासाहेब दखणे, शरद राठोड व नांदेड येथे दत्तात्रय आनंतवार, अतुल पाईकराव हे मागिल ६ ते ७ दिवसापासून ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी उपोषणास बसले आहेत.
त्या सर्व उपोषण कर्त्यांची तबियत खालावली आहे. त्यांच्या उपोषणाची शासन व प्रशासनाने आजुनही कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे सकल ओबीसी समाजामध्ये आक्रोश पसरुन खदखद निर्माण होत आहे. त्या आक्रोशाचा केंव्हा उद्रेक होईल हे सांगता येणार नाही. त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास सकल ओ.बी.सी. समाजामध्ये अशांतता पसरण्याची भिती आहे. म्हणून शासन व प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची त्वरीत दखल घेवून त्यांच्या ओ.बी.सी. समाजाच्या संविधानीक मागण्या मान्य करुन २४ तासाच्या आत त्यांचे उपोषण सोडवावे.
अन्यथा सकल ओ.बी.सी. समाजाच्या वतीने हिमायतनगर येथील नांदेड-किनवट नैशनल हायवेवर परमेश्वर कमानी समोर दि. २६/०९/२०२४ रोज गुरुवारी सकाळी ११.३० वाजता रास्ता रोको करण्यात येईल असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलनात होणाऱ्या घडा मोडीस आम्ही जबाबदार नसून, शासन व प्रशासन जबाबदार राहिल. याची नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति पोलीस निरीक्षक, पो.स्टे. हिमायतनगर यांना सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर ओ.बी.सी. समाज हिमायतनगर तालुकाध्यक्ष बाबाराव जर्गेवाड, दिलीप आला राठोड, सुनील जाधव, यांच्यासह असंख्य ओबीसी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.