मुंबई/नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हदगाव-हिमायतनगर मतदार संघातील जनतेच्या वाहतूक समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २६ मार्च २०२५ रोजी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी परिवहन मंत्री मा.ना. प्रतापरावजी सरनाईक यांची भेट घेतली. या भेटीत हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी नवीन बसेसची तातडीची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. यामुळे आता प्रवाश्याना खटाऱ्या व खिळखिळ्या झालेल्या बसेसच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे.


मागील अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या बसेस मोडकळीस आल्या असून, या खटाऱ्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हि बाब लक्षात घेऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी परिवहन मंत्री मा.ना. प्रतापरावजी सरनाईक यांची भेट घेऊन मतदार संघातील बहुतेक बसेस जुन्या आणि मोडकळीस आल्या आहेत. अनेक बसेस कालबाह्य व सेवाबाह्य होत आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्याचा कडाका असताना मोडकळीस आलेल्या बसमधून प्रवास करताना भरदुपारी उष्णतेमुळे प्रवास करणे खूप त्रासदायक ठरत आहे, सध्या लग्नसराईच्या हंगामामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. पण बसची उपलब्धता कमी असल्याने गर्दी आणि गैरसोयी निर्माण होत आहेत.


तसेच ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवासासाठी बसेस न मिळाल्यामुळे शिक्षणावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे मतदार संघात नवीन बसेसची मागणी पूर्ण करणे तातडीची गरजेचे असून, या संदर्भात परिवहन मंत्र्यांना अवगत करून नवीन बसेसची मागणी करण्यात केली आहे. हदगाव-हिमायतनगर मतदार संघातील जनतेसाठी नवीन बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून प्रवासी वर्ग सुखरूप आणि सुरक्षित प्रवास करू शकतील याबाबतचे महत्व पटवून दिले आहे.

त्यांच्या मागणीला अनुसरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीला गंभीरपणे विचार करून, लवकरच योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून, “हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील वाहतूक समस्येबाबत आम्ही संवेदनशील आहोत. यावर तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्याने हदगाव हिमायतनगर मतदार संघातील प्रवाशांना मोठ्या दिला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
