हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर पासून मौजे खडकी बाजार गावाकडे जाणारा (खडकी पांदन) (Make a pandan road) रस्ता चांगला व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र याकडे सर्वानीच दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावरील शेतकऱ्यांनी आता नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन सिमेंट काँक्रेट किंवा डांबरीकरण रस्ता करून द्यावा तसेच रोड़च्या बाजूने गावातील सांडपाणी जाण्यासाठी मोठी नाली बांधावी अशी मागणी केली आहे.


या मागणीला अनुसरून देण्यात आलेल्या निवेदात म्हंटले आहे कि, हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदीरापासून खडकी बाजार गावाकडे जाणारा (खडकी पांदन) रस्ता हा गाव नकाशावर पांदन रस्ता असून स्वातंत्र्यापासून आज पर्यन्त तयार करण्यात आलेला नाही. तसेच सदर पांदन रस्त्याने गावातील सांड पाणी दोन्हीकडेने वाहते त्यामुळे सदरील रस्त्यावर अतिशय घाण व दुर्गंधी साचलेली आहे. येथून ये – जा करताना शेतकऱ्यांसह पुःडील गावच्या नागरिकांना अतिशय दुर्गंधिच्या सानिध्यात वावरावे लागत आहे. या घाणीमुळे रोग राई पसरण्याची भीती वाढली आहे.

पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याने सदरील रस्त्यावरून आम्हा शेतकऱ्यांना चिखलातून रास्ता तुडवत शेतात ये-जा करणे अशक्य होत आहे. याअगोदर या रत्स्याला मंजुरी मिळाली मात्र संबंधिताने रस्त्याचे काम थातुर माथूर करून निधीची वाट लावली. त्यामुळे आजघडीला रस्ता खेड्यापेक्षही खडतर बनला आहे. हा रस्ता हिमायतनगर ते कामारी पर्यंत माध्यमार्ग म्ह्णून जुन्या काळापासून ओळखल्या जातो हि बाब लक्षात घेऊन श्री परमेश्वर मंदिरापासून जाणारा पांदण रस्ता सिमेंट काँक्रेटमध्ये किंवा डांबरीकरण करून अनेक वर्षांपासूनची होणारी अडचण दूर करावी.

तसेच रोडच्या बाजूने गावातील सांडपाणी जाण्यासाठी मोठी नाली बांधकाम मंजूर करून द्यावा या त्रासापासून शेतकरी, नागरिक व गावकर्यांना सुटका द्यावी असेही निवेदनकर्त्यानी म्हंटले आहे. या निवेदनावर श्यामजी मारुडवार, शिवाजी हरडपकर, सुभाष हेंद्रे, सदाशिव सातव, मोतिराम शिंदे, रामराव कोरडे, विशाल जाधव, परमेश्वर जाधव, आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
