नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महिलांनी अधिक पसंती दिली असून या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाखांच्या जवळपास महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 4 लाख 59 हजार 317 अर्ज मंजूर असून त्यांची टक्केवारी 97.11 एवढी आहे. तर आजच्या दिवशी पर्यंत जिल्हा समितीने मान्यता दिलेल्या अर्जाची एकूण संख्या 4 लाख 56 हजार 585 आहे. या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे बाकी आहे अशा महिलांनी तात्काळ त्यांचे आधार संलग्नीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना येत्या 17 ऑगस्टला जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच महिलांनी या योजनेतील अर्जात नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केले आहे की नाही यांची खातरजमा करावी. कारण ज्यांचे खाते संलग्न नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याअगोदरही याबाबत प्रशासनातर्फे वारंवार आवाहन केले असून अजूनही जिल्ह्यातील जवळपास 70 हजार महिलांचे आधार संलग्न करणे बाकी असल्याचे दिसून आले आहे. तरी महिलांनी तात्काळ आपले आधार संलग्नीकरण करण्याची कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


मतदारांना विधानसभेसाठी 20 ऑगस्टपर्यत मतदार नोंदणी करता येईल
17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान

नांदेड जिल्ह्यातील मतदारांनो विधानसभा निवडणुकीमध्ये आपली मतदार नोंदणी करणे बाकी असेल तर शेवटची मुदत 20 ऑगस्ट असून या तारखेपर्यत नोंदणी करुन घ्यावी. तसेच आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

येत्या शनिवारी व रविवारी म्हणजेच 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे, तपासणी करणे ही प्रक्रिया करता येणार आहे. जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. येत्या शनिवार व रविवारी म्हणजेच दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे.