किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट पंचायत समितीच्या “मनरेगा” विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी (एपीओ), कनिष्ठ अभियंता व संगणक चालकांच्या कारभाराला आता जनता वैतागली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागितल्यानंतर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. जवळपास शेतकर्यांच्या विहिरी, पाणंदरस्त्यासह विविध विकास कामांचा कारभाराची चावी त्यांच्याच हाती असल्याने हा विभाग सर्वाधिक भ्रष्टाचाराचे कुरण ठरले आहे. पारदर्शी प्रशासनाचा आव आणणार्या गटविकास अधिकार्यांनी किमान शेतकर्यांची तरी लूट होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


किनवट पंचायत समितीच्या कार्यकक्षेत जवळपास चारशे विहिरींच्या आसपास अत्यल्प भूधारक, अल्पभूधारकांशिवाय अन्य लाभार्थी शेतकर्यांचा अंतर्भाव आहे. पाणंदरस्त्याचीही कामे मोठ्या प्रमाणात अाहेत. सहायक कार्यक्रम अधिकारी (एपीओ), कनिष्ठ अभियंत्यासह संगणक चालक (कंत्राटी) यांच्यावर “मनरेगा” विभागाची जबाबदारी सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईकांनी योजनेची पायाभरणी करण्याचा मागचा उदेश शेतकर्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल व्हावा यासाठी म्हणून नाईकांनी अंमलात आणलेल्या योजनांचे रुपांतर होत होत २००९ पासून मनरेगा अंमलात आणली. मात्र त्यांचा उदेशाला भ्रष्ट यंत्रणेने खो देऊन प्रचंड मालामाल झाल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रवि राठोडांनीही या विभागात ठाण मांडून बसलेल्यांच्या पदस्थापनेची आणि नियुक्ती संबंधाने माहिती पत्रकाद्वारा रितसर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासन माहिती दडवत असल्याचा आरोप होतोय. ज्या शेतकर्यांनी प्रत्यक्ष विहिरींची कामे केलीत त्यांच्याकडूनही चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे करीत नसल्याची ओरड आहे. अनेक ग्रामपंचायतींकडे आणि तहसिलदारांकडे हाताला कामे मिळावीत म्हणून मजुरांनी मागणी केली मात्र कामे दिलेली नाहीत. योजना मनरेगाची कामे जेसीबीद्वारे. मग या कामाच्या मोजमाप पुस्तिकेत दाखवलेली कामे, मजुरांची बॅंक खाती व अन्य सोपस्कार कशासाठी ? असा प्रश्न पडतो. ही यंत्रणा नेमकी याच वर्मावर बोट ठेवून मलिदा लाटत असल्याच्या तक्रारी आहेत.




