नांदेड| स्वच्छतेचे पुजारी, लोकशिक्षक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त जवळा दे. येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय व गाव परिसर स्वच्छता करून गाडगेबाबांना कृतीशील अभिवादन करण्यात आले. तसेच परिसरात ‘नो प्लास्टिक’ अभियान राबवून गाडगेबाबांना आदरांजली वाहिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशन गच्चे, माजी सरपंच कैलास गोडबोले, माजी सरपंच साहेबराव शिखरे, हैदर शेख, पांडुरंग गच्चे, मनिषा गच्चे, कमलबाई गच्चे, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, इंदिरा पांचाळ, धम्मपाल गोडबोले, मिलिंद गोडबोले आदींची उपस्थिती होती. स्मृतीदिनाच्या औचित्याने मुख्याध्यापक ढवळे यांनी स्वच्छतेचे मानवी जीवनाताली महत्त्व विशद केले.
अभियानाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालय व शाळेत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व मुख्याध्यापक गंगाधर ढवळे व सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानास प्रारंभ करण्यात आला. ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यात आला. त्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांच्या वस्तूचे वेष्टन, रॅपर्स, रिकाम्या पाणी बाॅटल्स, प्लाॅस्टिकचे ग्लास, पाणी पाऊच, कॅरीबॅग, इतर प्लास्टिक वेस्टेजेस अशाप्रकारच्या कचऱ्याला एकत्रित करून नष्ट करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी या ‘नो प्लास्टिक’ अभियानात सहभाग नोंदवला.