नांदेड। गत दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देऊन रागाच्या भरात मी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला पण दहा वर्षात भाजपाकडे काही मागितलेलं नाही व कोणती निवडणुकही लढवली नाही.परंतू,भारतीय जनता पार्टीला मात्र कॉंग्रेसची माणसे मारायची असून त्या माणसांना त्यांना जगवायचे नाही असा थेट हल्लाबोल माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षात स्वगृही घरवापसी केल्यानंतर नांदेड रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांना केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी मुंबई येथे दि.२५ जून रोजी प्रवेश केला.त्यानंतर प्रथमच त्यांचे आज नांदेडमध्ये आगमन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम तसेच, पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते हितचिंतकांकडून पक्षचिन्ह असलेल्या तुतारीच्या निनादात, फटाक्याच्या आतिषबाजीसह जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आल्यानंतर रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या की,आपलं शांतीचं एक पर्व संपल असून आता कामाच पर्व सुरु झालेले आहे.
आगामी काळात खुप काम करायच आहे.आगामी विधानसभेच्या जागा लढवू,घरी बसलेले आहेत त्यांना वाटत होत आता कसं होणार.नवीन सुरुवात आहे चिंता करू नका.खा.शरदचंद्र पवार यांना मी शब्द दिला.फिरुन जन्मेन मी म्हणजे पुन्हा आता जोमाने पक्षबांधणी व पक्ष वाढीसाठी काम करणार आहे.माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, दिवंगत नेते माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर आणि माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र यांच्यासह आपले अनेक जूने सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडून गेले त्यांना पूनश्च आपल्यासोबत घेणार का ? या प्रश्नावर त्यांनी सदरची मंडळी नेते असून आपले कार्यकर्ते नाहीत त्यामूळे कोणी पक्षात या म्हणून विनंती केली किंवा त्याच्या मागे तगादा लावला तर ते पक्षात येत नाहीत.
मलाही मागील पाच वर्षापासून डॉ.सुनिल कदम हे पक्षात येण्यासाठी सांगत होते.मात्र मी योग्य वेळी योग्य निर्णय घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने पक्षात येणाऱ्या लोकांचे स्वागतच असल्याचे सांगून त्यामाध्यमातून घरवापसी करणार्यांना सूचक आवाहन केले.काॅग्रेस व राष्ट्रवादी आपल्यासाठी एकच असले तरिही आपण मात्र आपला पक्ष वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.तसेच,
आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष किती जागा लढविणार असल्याच्या प्रश्नावर त्यांनी आपणांस आठ दिवसाचा अवधी द्यावा त्यानंतर यावर बोलू असे माध्यमांना सांगून जिल्ह्यात पक्षाच्या घडामोडी,आढावा घेण्यासह संघटन वाढीसाठी त्या सज्ज असल्याचेच जणू एकप्रकारे स्पष्ट केले.
यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष भास्कर भिलवंडे,महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधुताई देशमुख,राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे,शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे,गंगाधर कवाळे पाटील, सय्यद मौला,गणेश तादलापूरकर, मारोती चिवळीकर,गंगाधर महाजन,आनंद पाटील, राहुल जाधव,श्रीकांत मांजरमकर, हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, सरदारखान,उदय देशपांडे,नायगांवचे तालुकाध्यक्ष बडुरे गुरुजी,माधव कोरे,नागमनी चलवदे आदींसह शहर व ग्रामीण भागातील पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व श्रीमती पाटील यांचे जूने सहकारी, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाचे दु:ख असल्याचा पुनरुच्चार
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काॅग्रेस सोडून गेल्याचे दु:खच आहे.पण त्याठिकाणी त्यांचे काय बर होईल ते त्यांना माहित होईल. परंतू,भारतीय जनता पार्टीला कॉंग्रेसचे माणसे मारायचे आहेत.त्यांना जगवायचे नाही.मी या अगोदरही अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याच्यानंतर हेच विधान केल होतं.अशोक चव्हाण यांनी भाजपात जाऊन स्वत:चे खुप मोठ नुकसान करून घेतल असल्याचाही पुनरुच्चार श्रीमती पाटील यांनी केला.
अनेकांना घरवापसीचे वेध !
श्रीमती पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षात घरवापसीनंतर त्यांच्या समर्थक,हितचिंतक म्हणून ओळख असलेल्या व भाजपासह अन्य पक्षात सद्या कार्यरत आणि मुख्यत्वे धर्मनिरपेक्ष मतांवर पूढील राजकीय वाटचाल करण्याच्या तयारीतील अनेकांना आता घरवापसीचे वेध लागले आहेत.आज श्रीमती पाटील यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्थानकावर आलेल्या अनेकांच्या उपस्थितीतून हे स्पष्ट झाले.