हिमायतनगर, दत्ता शिराणे| आगामी विधान सभा निवडणूकीची रंगीत तालीम आता सुरू झाली आहे. इच्छुकांनी आता आपले पत्ते उघड करण्यास सुरूवात केली आहे. परवाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तत्कालीन आमदार माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी ही आपण हदगाव हिमायतनगर विधान सभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगीतले. या अगोदर माजीमंत्री सूर्यकांताताई पाटील यांचे ही नाव इच्छुकांच्या यादीमध्ये अग्रक्रमाने आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढली असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना तिकीट मिळविण्यास मोठी कसरत करावी लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.
आगामी विधान सभेच्या निवडणूका काँग्रेस, राष्ट्र वादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधान सभेच्या निवडणुकीला सामोरे जातील. हे आता सुनिश्चित आहे. तर भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट व अन्य मित्र पक्ष महायुतीही कायम राहणार याची औपचारिक घोषणा बाकी असून जागा वाटपा बाबत आघडी व युतीमध्ये मुंबईत खलबते सुरू आहेत. हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे सामदाम दंड भेद या सर्व बाबीची तयारी करून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून सज्ज आहेत.
तर परवाच राज्याच्या माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांनी भाजपाला अखेर जयश्रीराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. आगामी विधान सभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांचे स्वगृही परतणे महत्वपूर्ण मानले जात असून नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या नेते राजेश टोपे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यानी श्रीमती पाटील यांना आघाडीची उमेदवारी द्यावी. अशी मागणी केली आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी ही आपल्या उमेदवारीबाबत परवाच सूतोवाच केले आहे. तर महा युतीत ही सुंदोपंदी चालू आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर हे आगामी निवडणुकीसाठी सज्ज आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची सतत भेट घेऊन आपलीच उमेदवारी पक्की आहे. असे ते जाहीर पणे सांगतात. तर भाजपचे पदाधिकारी ही ही जागा भाजपच्या वाट्याला द्यावी. अशी मागणी करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून ही अनेकांनी आपले दावे केले आहेत. काँग्रेस पक्षाचे माजी सभापती दिलीप राठोड यांनी काँग्रेस ला रामराम ठोकून गेल्या महिनाभरापूर्वी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित कडून ते इच्छुकांच्या यादीत आहेत. जागा वाटपाचा तिढा कायम असून, आघाडीत व महायतीत तिकीटासाठी सध्यातरी रस्सीखेच सुरू आहे एवढे मात्र निश्चित.