नांदेड| अतिसार रोखण्यासाठी तसेच ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी गाव स्तरावर मोठया प्रमाणात जनजागृती करावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्टॉप डायरिया अभियान तसेच स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा ही मोहिम सुरू असून या माहिम गतिमान करण्यासाठी आज मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सलमा हिराणी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता वाडिकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, अधिक्षक अल्केश शिरशेवार आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, जलजन्य आजार होऊनयेत यासाठी गावपातळीवर योग्य ती खबरदारी घ्यावी. आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी तीन टप्प्यात स्टॉप डायरिया अभियान राबवून अतिसार रोखावा. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येक कुटूंबाकडे ओला कच-यासाठी हिरवा तर सुका कच-यासाठी निळी कचरा पेटी ठेवण्यासाठी गृहभेटी देवून त्याचे महत्व सांगावे. तसेच राज्य शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गुगल फॉममध्ये गृहभेटीतून प्रश्नावलीव्दारे माहिती भरुन फोटा अपलोड करण्याचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी स्वच्छता व अतिसार रोखण्यासाठी ओआरएस घरच्या घरी तयार करण्याची पध्दत गावक-यांना समजावून सांगावे जणे करुन घरच्या घरीच ओआरएस तयार करुन ते त्याचा वापर करु शकतात असे म्हणाल्या. यावेळी त्यांनी स्टॉप डायरीया मोहिमेतील मुद्यावंर सविस्तर माहिती दिली. याप्रंसगी जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनीही या प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत पाणी, आरोग्य व स्टॉप डायरिया, स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा अभियान, पाणी गुणवत्ता कार्यक्रम, तालुका प्रयोगशाळा संरचना आणि कामे, रासायनिक व जैविक फिल्ड टेस्ट तपासणी व प्रात्यक्षिक तसेच पाणी नमुने गोळा करण्याची पद्धती व घ्यावयाची काळजी आदी विषयीवर मिलिंद व्यवहारे व कपेंद्र देसार्इ यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले. सुत्रसंलान मिलिंद व्यवहारे तर उपस्थितांचे आभार अल्केश शिरशेटवार यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हा कक्षातील डी.डी. पवार, विशाल कदम, महेंद्र वाठोरे, नंदलाल लोकडे, कृष्णा गोपीवार, सुशील मानवतकर, निकिशा इंगोले, विठ्ठल चिगळे, सूर्यकांत हिंगमीरे, सारिका कदम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, विस्तार अधिकारी आरोग्य, विस्तार अधिकारी पंचायत, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सुपरवायझर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, शिक्षण विस्तार अधिकारी, आयसीडीएसचे अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बीआरसी, सीआरसी, इंजिनियर, ऑपरेटर आदींची उपस्थिती होती.