दिल्ली। पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून अतिरेक्यांना धडा शिकवणारे मोदी सरकार चीनने बळकावलेला भारताचा भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात आणेल,असा विश्वास भाजपचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज लोकसभेत व्यक्त केला.
सध्या तवांगच्या मुद्द्यावरून राजकारण बरेच तापले आहे. याच मुद्द्यावरील चर्चेमध्ये खा.चिखलीकर हे आज लोकसभेत बोलत होते. या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून राजेंद्र अग्रवाल हे काम पाहत होते. भारत तिब्बत सहयोग मंच द्वारे देशभरात कैलास मानसरोवर मुक्ती,तिब्बत आझादी आणि १९६२ साली घेतलेल्या संकल्पाची पूर्तता होण्यासाठी जनजागृतीपर १४ नोव्हेंबर हा दिन संकल्प स्मरण दिन म्हणून राबविला जातो.
यादिवशी देशभर भारत तिब्बत सहयोग मंच पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्राचे खासदार यांना संकल्प स्मरण दिनाचे पत्र देऊन हिवाळी अधिवेशनात विषय मांडला जावा यासाठी प्रयत्नशील असतात. यापैकीच एक महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे खा.प्रतापराव पा.चिखलीकर यांना भारत तिब्बत सहयोग मंच पदाधिकारी यांनी संकल्प स्मरण पत्र दिले होते. या विषयाला अनुसरून त्यांनी गत काही दिवसांपूर्वी घडलेल्या तवांग परिसरातील तणावपूर्ण स्थितीवर संसदेत आवाज उचलला आहे.
खासदार चिखलीकर बोलताना म्हणाले की,1962 च्या हल्ल्यानंतर चीनने भारताचा तत्कालीन ‘नेफा’ भागाचा सुमारे तीन हजार चौरस किलोमीटर इतका भूभाग बळकावला आहे. तेव्हा दि. 14 नोव्हेंबर 1962 रोजी लोकसभेच्या संयुक्त सभागृहामध्ये चीनने बळकावलेला इंच इंच भूभाग पुन्हा भारतामध्ये आणण्याचा ठराव मंजूर केला होता. त्या वेळी तसा संकल्प भारतीय संसदेने केला होता. परंतु,गेल्या 60 वर्षांत कोणत्याही सरकारने त्या संकल्पाकडे गांभीर्याने पाहिले नाही. किंबहूना आतापर्यंतची सर्व सरकारे त्या संकल्पाबाबत उदासीनच होती,असा आरोप खा.चिखलीकर यांनी केला.
2014 सालापासून म्हणजेच,मोदी सरकार आल्यापासून या देशात प्रखर राष्ट्रभक्ती आणि दहशतवादाबाबत ‘झिरो टॉलरन्स’चे सरकार आहे. मोदी सरकारने पाकिस्तानच्या घरात घुसून अतिरेक्यांना धडा शिकविला होता,याची आठवण खा.चिखलीकर यांनी या वेळी करून दिली. असे हे मोदी सरकार चीनने बळकावलेला भारताचा भूभाग आपल्या देशात पुन्हा सामील करून घेईल,अशी जनतेची अपेक्षा आहे आणि मलाही तसा विश्वास वाटतो,असे खा. चिखलीकर यांनी संसदेत बोलताना नमूद केले.
राज्यातील सर्वच खासदारांनी ‘संकल्प स्मरण दिन’ याविषयी महत्वपूर्ण निर्णय होण्यासाठी सहभाग नोंदविला पाहिजे,भारत तिब्बत सहयोग मंच गत ११ वर्षांपासून तवांग तीर्थ यात्रा आयोजित करत आहे,आणि याच तवांग भागावर चीनी ड्रॅगनने हल्ला केला असून,याविषयी सर्व खासदारांनी सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विषयाशी सहमत राहून “संकल्प स्मरण दिन” नावे चीनने काबीज केलेली सर्व जमीन परत मिळविण्यासाठी महत्वपूर्ण एक समिती गठीत करण्यासाठी सरकारकडे आग्रह केला पाहिजे…
…गजानन जोशी, राष्ट्रीय महामंत्री – युवा, भारत तिब्बत सहयोग मंच.