भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचा आज वाढदिवस. या निमित्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी लिहिलेला लेख येथे देत आहोत.
एखाद्या नेत्याकडे समर्पित भावनेने काम करणारी कार्यकर्त्यांची टीम असणे अत्यंत आवश्यक आहे. जर ही टीम नेहमीच ‘ॲक्टीव्ह मोड’ वर असेल तर त्या नेत्याची राजकीय उंची अधिक वाढते. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची उर्जा निर्माण करतांनाच त्यांचे सुख, दुःख नेत्यांपर्यंत पोंहचवून त्यांच्याकडून कार्यकर्त्यांसाठी मदतीचा हात देणारा एखादा दुवा आवश्यक असतो.
उपरोक्त वर्णन केलेल्या या सर्व बाबींमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण व कार्यकर्त्यांमध्ये दुवा म्हणून काम करण्याची महत्वपूर्ण भूमिका अमरनाथ राजूरकर नेहमीच वटवत असतात.
अमरनाथ राजूरकर हे बालपणापासून कुशाग्रबुध्दीचे विद्यार्थी होते. विद्यार्थी दशेतच राजकारणाचे विविध पैलू त्यांना जवळून पहाता आले. खरेतर त्यांचे वडिल पोलिस खात्यामध्ये अधिकारी होते. आपल्या प्रमाणे आपले पूत्र अमरनाथ राजूरकर हे सुध्दा पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करावेत अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांचे वडील अनंतराव राजूरकर यांनी पाऊले उचलली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमरनाथ राजूरकर यांना नाशिकच्या पवार पोलीस ॲकॅडमीमध्ये पूर्व प्रशिक्षणासाठी पाठविले. परंतु त्याठिकाणी त्यांचे मन रमले नाही.
शिवाजीनगर भागात ज्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासासमारेच अमरनाथ राजूरकर यांचेही निवास आहे. त्यामुळे असेल कदाचित अमरनाथ राजूरकर यांचा राजकारणाकडे कल राहिला आहे. काँग्रेसमध्ये असतांना एनएसयुआय पासून त्यांनी त्यांच्या कार्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसच्या विविध पदांवर काम करतांना महानगराध्यक्ष, प्रदेश सचिव, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष आदी महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. मॅनेजमेंट गुरु असलेल्या अमरनाथ राजूरकर यांच्यावर केवळ नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणच्या राजकीय सभा व मेळावे घेण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्यावर टाकली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या सभा व्यवस्थापनाचे राज्यभर कौतूक होऊ लागले.
पक्ष संघटनेत काम करीत असतांना विधीमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहात जाण्याची मनीषा त्यांनी आपले नेते खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे बोलून दाखविली. लोकांप्रती त्यांनी काम करण्याची असलेली भावना, अठरा अठरा तास काम करीत राहण्याची त्यांची प्रवृत्ती व चव्हाण कुटुंबीयांप्रती त्यांची असलेली निष्ठा या सर्व बाबी लक्षात घेवून 2010 च्या नांदेड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून त्यांना खा.अशोकराव चव्हाण यांनी उमेदवारी दिली. या संधीचे सोने करत त्यांनी ही निवडणूक बिनविरोध जिंकली. खरे तर या निवडणुकी दरम्यान खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अडचणीचा काळ होता. परंतु त्यावरही मात करत ते बिनविरोध निवडूण येण्यात यशस्वी झाले.
अमरनाथ राजूरकर यांनी त्यांचे मतदार असलेल्या सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत सदस्य यांच्यासह पंचायत समिती सभापतींचे कामे अत्यंत नेटाने केली. त्यामुळे मतदारांसाठी काम करणारा आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख झाली. सहा वर्षांनंतर पुन्हा 2016 साली त्यांच्या नेतृत्व गुणावर विश्वास ठेवत खा.अशोकराव चव्हाण यांनी दुसऱ्यांना विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली.
एका बाजूस जिल्ह्यातील मातब्बर नेते निवडणूक रिंगणात शड्डू ठोकून उभे होते. तर दुसऱ्या बाजूस खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ राजूरकर यांनी एकहाती किल्ला लढविला. प्रारंभी चुरशीची वाटलेली ही निवडणूक सुध्दा अमरनाथ राजूरकर यांनी सहजरित्या जिंकली. त्यानंतर विधान परिषदेची निवडणुकच झाली नाही. आता पुढच्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर ही निवडणुक लागेल व यातसुध्दा त्यांनाच उमेदवारी मिळून ते नक्की विजयी होतील असा विश्वास वाटतो.
अमरनाथ राजूरकर यांना कामाचा प्रचंड झपाटा आहे. एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. जिल्ह्यातील अनेक निवडणुकांची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षास विजय मिळवून दिला आहे. खा.अशोकराव चव्हाण यांच्यासाठी अहोरात्र झटणारा अमरनाथ राजूरकर हे तर खा.अशोकराव चव्हाण यांचे रामभक्त हनुमान आहेत असेच म्हटले जाते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ.श्रीजया चव्हाण यांच्या विजयासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधली होती. त्यांचा तब्बल एक महिना भोकर येथेच मुक्काम होता. भोकर तालुक्यातील वाडी, वस्ती, तांडा, गाव ते भोकर शहर हा सर्व भाग त्यांनी पिंजून काढला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
आ.श्रीजया चव्हाण यांना विजयी करणे कसे आवश्यक आहे हे लोकांना उदाहरणासह समजावून सांगितले. या सर्वांची फलश्रुती म्हणून भोकर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असलेल्या आ.श्रीजया चव्हाण यांना मोठे मताधिक्य मिळाले. या मताधिक्यामध्ये जसा खा. अशोकराव चव्हाण, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.श्रीजया चव्हाण यांचा वाटा आहे तितकाच वाटा अमरनाथ राजूरकर यांचा आहे.
अमरनाथ राजूरकर यांना टीम बांधणे याची विशेष आवड आहे. ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी खा.अशोकराव चव्हाण यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ते टीम बांधतात. त्यांच्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोहंचतात व त्यातून पक्षाला मदत करण्याचे काम करतात. खरे तर आ.श्रीजया चव्हाण या नव्याने भाजपात दाखल झालेल्या. वर्षानुवर्षे काँग्रेसच्या निशाणीवर मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनावर कमळ ही निशाणी बिंबविणे हे कठीण काम होते. परंतु हे काम सुध्दा त्यांनी लिलया पार पाडले. यासाठी त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमचा खुबीने वापर केला. कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारा नेता म्हणून अमरनाथ राजूरकर सुपरिचित आहेत.
श्री दत्तात्रय, माता तुळजाभवानी व श्री कुबेर भंडारीचे अमरनाथ राजूरकर हे निस्सीम भक्त आहेत. यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जी जी स्वप्न पाहिली आहेत ती पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो.
लेखक… संतोष पांडागळे ,प्रवक्ता भाजपा नांदेड जिल्हा.