श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाला सुरुवात होवून दि.८ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले आहे.अशातच काल दुपारी १ वाजताच्या व दुपारी ३ च्या दरम्यान पून्हा जोरदार अर्धा तास पाऊस झाला. दरम्यान, काढणी सुरू असलेले सोयाबीन जाग्यावरच भिजल्याने अनेक शेतकर्याचे नूकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.
मंगळवारी व गुरुवारी पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यात कापूस आणि सोयाबीन असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड केली जाते. यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्हीही पिकांचे पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अशीच काय ते शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची अवस्था आहे.
सुरुवातीला महागडी खत बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार झालेल्या पावसाने सुरुवातीपासूनच ही पिकं पावसाच्या कचाट्यात आली. मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले तरीही शेतकरी उभे राहिले.मंगळवारी व गुरुवारी झालेल्या पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली सोयाबीन आणि कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजवून गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्यातून सोयाबीन काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
वेचणीला आलेल्या कापसाची काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र आहे. संपूर्ण कापूस पाण्यामुळे भिजल्याने कापसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पादनावर दिवाळी सणाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतातून उत्पादन निघणार नसल्याने दिवाळी तरी साजरी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.