किनवट,परमेश्वर पेशवे। हिमायतनगर पासून विदर्भातील महागाव तालुक्याच्या धनोडा पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग १६१ ए चे मागिल सात वर्षापासून काम चालू आहे. किनवट शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून गोकुंदा शहरातील सेंटमेरी शाळेपर्यंत मार्ग या ना त्या कारणांनी काम रेंगाळत ठेवले आहे. कार्यारंभ आदेशानंतरही अद्यापतरी सात वर्षात काम चालू केलेले नाही. ना खराब झालेल्या मार्गाचे डांबरीकरणही केलेले नाही. या दोन्ही ठिकाणी हाॅटमिक्स डांबरीकरण करुन धूळीपासून नागरीकांना दिलासा देण्याची मागणी, व्हाॅईस आँफ मीडियाच्या किनवट शाखेने किनवटच्या सहायक जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
गोकुंद्यातील सेंट मेरी शाळेपासून किनवट-गोकुंद्याच्या सरहद्दीपर्यंत आणि किनवट शहरातील अशोक स्तंभापासून ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या सीसीकरणाचे काम केलेले नसल्यामुळे लहान वाहानांपासून अवजड वाहानांच्या दळण-वळणांमुळे रात्रं-दिवस प्रचंड धूळ उडते. पर्यावरणाची वाताहत, प्रदूषन भयानक वाढले आहे. धूळीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कांहींना श्वसनाचे आणि डोळ्यात धूळ जाऊन आजार झाल्याचे समजते, याला कोणी वाली आहे कि नाही ? असा सवालही व्हाॅईस आँफ मीडियाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकाला आदिवासी, मागास तालुका हा किनवट तालुका आहे. सर्वच संबंधित विभागाचे या प्रदूषनाकडे दूर्लक्ष होतांना दिसते. प्रशासनातील अधिकार्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा खाली घेऊन प्रवास केल्यास धूळीमुळे आम नागरीकांना काय त्रास होतो याची जाणीव होईल. पर्यावरणाचा कसा र्हास होतोय याची त्यांना कल्पना येईल.
म्हणून हा रेंगाळत ठेवलेला मार्ग हाॅटमिक्स डांबरीकरण करण्यात यावे. जसे, राजगड-लोणी घाटात सीसीकरण न करता डांबरीकरण केलेले आहे तसे. तेच निकष वापरुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ते सेंटमेरी शाळेपर्यंत डांबरीकरण करुन प्रदुषणमुक्त मार्ग करावा, यासाठी आपल्या स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करावी, अशी लोकहितास्तव “व्हाॅईस आँफ मीडिया किनवट तालुका शाखेने मागणी केली आहे.