हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मूर्तीच्या कमानीला चांदीची झळाळी लावण्याचे काम सुरु -NNL

0
4

हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ – तेलंगणाच्या मध्यभागी असलेल्या महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. सव्वासातशे वर्ष जुने असलेल्या श्री परमेश्वर मंदिरात हरिहर रूपातील श्री परमेश्वराची उभी मूर्ती भुयारामध्ये स्थापन आहे. श्री परमेश्वर मूर्ती काळ्या पाषाणातील दगडावर कोरलेली असून, मूर्तीच्या बाजूने असलेल्या संगमरवरी दगडाच्या कमानीवर मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या देखरेखीखाली चांदीचा पत्रा व छत्री लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चांदीच्या नक्षीकामामुळे मूर्तीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या देवीदेवतांच्या मूर्तीसाठी चांदीच्या, सोन्याच्या प्रभावळ, सिंहासन बनविले जात असल्याचे आपण ऐकलं आहे. त्याचं धरस्तीवर आता श्रीक्षेत्र हिमायतनगर (वाढोणा) येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिराच्या मूर्तीला सुद्धा चांदीची झळाळी चढविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सबंध भारतामध्ये एकमेव असलेले श्री परमेश्वराचे मंदिर तीर्थक्षेत्रात रूपांतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मंदिराच्या विकास कामाला गती आली आहे. वाढोण्यातील श्री परमेश्वर मंदिर इतिहासकालीन वारसा जपत एकविसाव्या शतकात दिमाखात उभ आहे. त्याकाळी मंदिराच्या भिंतीसह कळसावर केलेल्या कोरीव काम, शिल्प शास्त्रानुसार केलेली मंदिराची उभारणी, वाखण्याजोगी आहे. मंदिराचा इतिहास तर अभ्यासना जोगा असून, हि मूर्ती येथील शेतकरी दळवी पाटील यांच्या शेतात नांगर हाकताना मिळून आली होती असे जुने जाणकार सांगतात. तेंव्हापासून महाशिवरात्रीच्या वेळी येथे पंधरा दिवसाचे भव्य यात्रा महोत्सव भरविले जाते. त्यामुळे येथील श्री परमेश्वर मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

यात्रा काळात तेलंगणा, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदि राज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होऊन श्री परमेश्वराच्या दर्शन घेऊन आपला नवस पूर्ण करतात. श्री परमेश्वर मंदिर समितीकडून विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच गोरगरिबांना मदत, अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि भुकेल्याला अन्न देण्याचे कार्य भाविक भक्तांच्या सहकार्यातून अविरत चालविले जाते. तसेच श्रावण महिन्यात संपूर्ण महिना विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आणि अन्नदानाच्या पंगती केल्या जातात. मागील वर्षभरापासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात विविध कामामुळे मंदिराच्या कायापालट  झाला असून, गतवर्षी मुंबई येथून दोन किलो सोन्याचे दागिने बनवून आणण्यात आले. मंदिर परिसरात विविध रंगीत दिवे लावण्यात आले, तसेच विहिरीवर बसवलेल्या कारंजामुळे मंदिर परिसर सप्तरंगी प्रकाशात न्हाऊन निघत आहे. मंदिराच्या मुख्य कमानीवर देखील एलईडी लाईटमध्ये श्री परमेश्वर मंदिराचे नाव कोरले गेले असून, या आकर्षक विद्युत रोषणामुळे श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचे मन प्रसन्न होत आहे. तसेच मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, प्रांगणात भव्य शेड आणि मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यासाठी मोठी एलईडी स्क्रीन बसविण्यात आली आहे.

आगामी काळात ज्या भागात सीसीटीव्ही नाहीत त्या परिसरात नवीन एचडी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, मंदिर परिसरात सुरक्षेसाठी आता चोख बंदोबस्तही लावला जाणार आहे. मागील वर्षभरापासून श्री परमेश्वर भक्त महिलांकडून दररोज मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ आणि प्रांगणात आकर्षक रांगोळीने सजावट केली जात आहे. मंदिर परिसर सभोवताल जागेची दररोज पाच ते दहा कर्मचाऱ्याकडून स्वच्छता केली जात असल्याने मंदिराचे पवित्र राखण्यास मदत मिळते आहे. आता यात आणखी भर म्हणून श्री मूर्ती जवळील कमानीला चांदीचा पत्रा लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मूर्तीच्या जवळील कमानीवर चांदीचा विविध नक्षीकाम करण्यात आलेला पत्रा बसविला जाणार असून, नुकतेच या संदर्भांत मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत बैठक होऊन या कामाला गेल्या तीन दिवसापासून सुरुवात झाली आहे.

दरम्यान काम सुरु असताना आज दि.३० सोमवारी मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, संचालक मंडळीं, मंदिराचे अर्चक परमेश्वर नरारे, आणि दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तानी मंदिराच्या नूतन कामाची पाहणी केली.  चांदीचा पत्रा लावण्यापूर्वी संगमरवरी दगडावर सागवानाची लाकडी डिझाईन बसविण्याचे काम उमरखेड येथील लकडी कारागीर मांगीलाल जांगीड व त्यांचे सहकारी करत असून, त्यावर चांदीचा पत्रा चढविण्याचे काम मुंबई येथील चेतन जैन नामक कारागीर करणार आहे. यामुळे श्री परमेश्वर मूर्तीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. हा सर्व खर्च मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तांनी श्री परमेश्वराला अर्पण केलेल्या विविध प्रकारचे सोने – चांदीचे दागिने तसेच देणगी स्वरूपात मिळालेले दान आणि मंदिराच्या गाळ्यांचे भाडे या सर्व निधीचा वापर करून केला जात आहे. श्री परमेश्वर मंदिर कमिटीने गतवर्षी दोन किलो सोन्याचे दागिने बनविले असून, आता श्री मूर्तीवर जवळपास 3 किलो सोन्याचे दागिने झाले आहेत. यावर्षी मंदिराच्या सभोवताली चांदीचा पत्रा व छत्री बसविली जाणार असल्याने भाविक भक्ताकडून होत असलेल्या कामाबाबत आनंद व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here