नांदेड| श्री क्षेत्र माहूर गड जि.नांदेड येथील श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे पहिले अधिवेशन १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कपीलेश्वर धर्म शाळेत सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने थाटामाटात पार पडले. प्रस्ताविक सीटू राज्य सचिव तथा युनियनच्या सरचिटणीस कॉ. उज्वला पडलवार यांनी केले.


अधिवेशनास शुभेच्छा देण्यासाठी अ.भा.किसान सभेचे जिल्हा सचिव तथा शेतकरी नेते कॉ.किशोर पवार आणि काँग्रेसचे नेते डॉ.निरंजन केशवे, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड तसेच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जयकुमार अडकीने यांची उपस्थिती होती.त्यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.

माहूर गडावर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन शाखेची स्थापना १५ नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आली आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी २७ जानेवारी २०२० रोजी पासून श्री रेणुका देवीच्या पहिल्या पायरीजवळ ५ दिवस साखळी उपोषण करून देवस्थान व विश्वस्तांचे लक्ष वेधले होते. तेव्हा तत्कालीन सचिव तथा किनवट चे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल (भाप्रसे) यांनी सेवापुस्तिका व सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश देण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले होते.

परंतु अंमलबजावणी झाली नसल्याने दोन वर्षानंतर पुन्हा १० जानेवारी २०२२ रोजी पासून गडावर पहिल्या पायरीजवळ तब्बल ८४ दिवस सीटूच्या वतीने अखंड साखळी उपोषण करण्यात आले. परंतु किनवटचे उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे सचिव श्री किर्थीकिरण पुजार यांनी कसल्याच प्रकारची उपोषणाची दखल घेतली नाही. सदरील संस्थांनचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उपाध्यक्ष उप विभागीय पोलीस अधिकारी, सचिव किनवटचे उप विभागीय अधिकारी तर तहसीलदार हे कोष्याध्यक्ष आहेत.तरी देखील येथील कर्मचारी कायदेशीर न्याय हक्कापासून वंचित आहेत.

सीटू संलग्न संघटचे युनिट्स, सप्तश्रुंगी देवस्थान,त्रंबकेश्वर देवस्थान नाशिक,शनी सिंगनापूर देवस्थान व माहूर गड देवस्थान येथे कार्यरत असून माहूर वगळता इतर ठिकाणी २३ हजार ते ६० हजार रुपये पगार कर्मचाऱ्यांना मिळतो आहे. तसेच शासकीय सर्व सुविधा लागू आहेत. या अधिवेशनास मार्गदर्शन करण्यासाठी सप्तश्रुंगी गडावरील युनिटचे अध्यक्ष कॉ.तुकाराम सोनजे,कॉ.शरद अहिरे, शनी सिंगापूर देवस्थान कमिटीचे पदाधिकारी कॉ.श्यामसुंदर शिंदे व कॉ.सुखदेव मनाळ आदिजन उपस्थित होते. सदरील लढाऊ नेतृत्वाने सखोल व कायदेशीर मार्गदर्शन केले.
या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी कामकाज पाहण्यासाठी नवीन कमिटीची निवड एकमताने करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव तर सचिव पदी कॉ.अरुण घोडेकर तसेच उपाध्यक्ष पदी कॉ.अरविंद जाधव व कॉ.नितीन गेडाम, सहसचिव कॉ.विनोद कदम व कॉ. गजानन घुगे तर कोष्याध्यक्ष पदी कॉ.आकाश वानखेडे यांची निवड करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. आकाश जाधव,कॉ.उकंडराव जाधव, कॉ.इंद्रजित राठोड, कॉ सुंदरसिंग पवार, कॉ. दिपक जगदाळे, कॉ.राजू कराळे,कॉ. भास्कर शिंदे, डॉ.सुप्रिया कदम, कॉ.अर्चना गीरी,कॉ.शीतल वायकोळे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी संघटनेचे सभासद तथा संस्थांनचे कर्मचारी कॉ. विनोद सरतापे यांचा मुलगा एमबीबीएस साठी पात्र ठरल्यामुळे व कॉ. भास्कर शिंदे यांचा मुलगा महाराष्ट्र पोलीस दलात लागल्यामुळे तसेच कॉ.सुंदरसिंग पवार यांची मुलगी पोलीस दलात लागल्यामुळे या पालकांचा सीटू च्या वतीने शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यातील विविध देवस्थानातील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा एप्रिल मध्ये शनी सिंगनापूर येथे घेण्यात येणार असून माहूर येथील कर्मचारी त्या मेळाव्यास जाणार असल्याची माहिती कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली.