हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत 2025 ची सार्वत्रिक निवडणूक जोरात सुरू असताना शहरात मूलभूत नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे. शहरातील चौक-चौकात दुर्गंधी, नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर, साचलेली घाण आणि अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.


प्रचारात मग्न उमेदवार, पण समस्या दुर्लक्षित – प्रत्येक वार्डात उमेदवारांची प्रचारफेरी सुरू असली तरी शहराचे विदारक वास्तव त्यांच्या नजरेस पडत नाही का? असा सरळ सवाल नागरिक विचारू लागले आहेत. नेत्यांचे लक्ष गगनचुंबी आश्वासनांकडे; पण आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा यासारख्या मुलभूत प्रश्नांकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही हे शहराचे दुर्दैव असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.



पंचवार्षिक काळात विकासाऐवजी दुरवस्था? – गेल्या पाच वर्षांत शहराचा रस्ते, नाले, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा या सगळ्याच क्षेत्रांत झालेला ऱ्हास स्पष्ट दिसून येत आहे. खोदलेले रस्ते, तुंबलेले नाले, अतिक्रमणाचा विळखा यामुळे शहराचा विकासाऐवजी भकासपणा वाढल्याचा आरोप नागरिक करतात.


डासांचा उपद्रव वाढला – नागरिक आजारी – तुंबलेल्या नाल्यांमुळे डासांची उत्पत्ती प्रचंड वाढली असून, घराघरात आजारपणाने थैमान घातले आहे. आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पक्षांना मतदार ठोस उत्तर देण्याच्या मूडमध्ये आहेत.

बॅनरबाजी आणि भोंग्यांचा त्रास – अपघाताचा धोका – हिमायतनगर शहरभर उमेदवारांच्या बॅनरांनी चौक-चौक झाकले गेले आहेत. यामुळे यु-टर्न, वाय-टर्न अस्पष्ट, रस्त्यावर दृश्य अडथळे, अपघाताची भीती वाढली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत आहे का? — हा प्रश्न सुजाण नागरिक उपस्थित करीत आहेत.
वाहन तपासणीचा दिखावा? – मुख्य चौकातील तपासणी नाके फक्त सामान्य नागरिकांची वाहने थांबवण्यासाठी, तर मंत्री-संत्री आणि मोठे ट्रक मात्र सरळ जात असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. काही पत्रकारांनाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागल्याने आचारसंहितेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत का? हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जनता सज्ज — हुशार आणि जबाबदार उमेदवाराची शोध – हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक तापली असली तरी यावेळी जनता आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, स्वच्छ पाणी, रस्ते, अपंग व निराधारांच्या समस्या आणि विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या निवडणूकीच्या काळात नागरिकांच्या सूचनेला केरची टोपली दाखविणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला जागा दाखविण्याच्या तयारीत जनता जनार्धन आहे, एकूणच हिमायतनगरच्या समस्यांना न्याय मिळणार का? याचा निर्णय 2 डिसेंबरला उमटणाऱ्या जनादेशावर अवलंबून आहे.


