नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. शिवाजी चव्हाण यांनी दि. ८ नोव्हेंबर २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२३ या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये केलेल्या ३००० कि.मी. सायकलिंग प्रवासाची नोंद भारताच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड-२०२४’ मध्ये घेण्यात आली आहे. आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी येथील एल.जी.बी. विमानतळापासून प्रा. चव्हाण यांनी सायकलिंग सुरूवात केली होती.
१५ दिवसात ते भारताच्या गुजरात राज्यातील पोरबंदर येथे पोहोचले. अशा प्रकारची एकट्याने व कोणताच आधार न घेता केलेली ही सायकलिंग आतापर्यंत भारतातून कोणीही केलेली नाही. त्यामुळे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने याची नोंद घेतली आहे. जगातील विविध प्रकारच्या रेकॉर्डसाठी जसे ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ आहे. त्याचप्रमाणे भारतासाठी भारतीयांचे रेकॉर्ड या रेकॉर्डमध्ये नोंदवले जातात. यासाठी ‘स्ट्रॉव्हा अँप चा डेटा, गारमीन जीपीएस डेटा, मोबाईल टाईम लाईन डेटा, २५ व्हिडिओ क्लिप, ४० फोटो रेकॉर्ड आणि प्रवासात थांबलेल्या ठिकाणाचे पुरावे या पुरस्कारासाठी तपासले गेले आहे. या पुरस्काराचे स्वरूप गोल्ड मेडल, प्रमाणपत्र, रेकॉर्ड बुकची प्रत व यासंबंधित ओळखपत्र असे आहे.
सायकल प्रवास करताना ऊन, वारा, पाऊस, थंडी, धुकं अशा अनेक अडचणींना सामोरे जात दररोज कमीत-कमी २०० कि. मी. सायकलिंग करत त्यांनी भारताच्या पूर्वेकडील आसामच्या दुर्गम भागातून प्रवास सुरू केला होता व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पोरबंदर येथे येवून हा प्रवास थांबला. भारताच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा लांब महामार्ग एनएच-२७ या महामार्गावरून हा प्रवास करण्यात आला होता.
‘उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवा’ हा संदेश देशातील जन-माणसात पोहोचावा हा या प्रवासामागचा हेतू होता असे प्रो. चव्हाण म्हणाले. जीवनात नवचैतन्य पाहिजे असेल, आजारापासून दूर राहायचं असेल, मरगळ झटकायची असेल व दीर्घायुष्य व्हायचं असेल तर दररोज सायकल चालवावी असेही ते म्हणाले. प्रा. चव्हाण आजही दररोज कमीत-कमी ४५ ते ५० कि.मी. सायकलिंग करतात.
आज त्यांच दोन वर्षातील सायकली मीटर रिडींग ३६ हजार कि.मी. एवढं आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठता डॉ. एम.के. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, जैवशास्त्र संकुलातील सहकारी प्रो. टी.ए. कदम, प्रो. बि.एस. सुरवसे, प्रो. एल.एच. कांबळे, प्रो. राजेश टाले यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.