नांदेड| ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना कायम प्रयत्नशील आहे. आता निवडणुका जवळ आल्याने व्यक्तिगत विरोधातून काही लोक काहीही बोलतात. मात्र त्यातील सत्यता तपासून घ्या असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना केले आहे.


भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव आणि डोंगरकडा युनिटची ३१ वी सर्वसाधारण सभा आज देगाव इथल्या कारखान्याच्या आवारात पार पडली.या सर्वसाधारण सभेला चेअरमन गणपतराव तिडके , व्हाईस चेअरमन नरेंद्र चव्हाण , युवानेत्या श्रीजया चव्हाण , लक्ष्मण जाधव, दिलीपराव देशमुख , श्यामराव टेकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संजय लहानकर, बालाजी गव्हाणे, गोविंदराव शिंदे नागेलीकर ,कार्यकारी संचालक श्याम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याच्या या सर्वसाधारण सभेला सभासदासह ऊस उत्पादक शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.


या सर्वसाधारण सभेत अनेक ठराव मंजूर झाल्यानंतर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना चव्हाण यांनी शेतक-यांना कारखान्याची आर्थीक परिस्थिती सुधारण्यासाठी ऊस लागवडीचा कार्यक्रम ठरऊन घ्या अशी कळकळीची विनंती केली. दोन्ही साखर कारखान्याची गाळप क्षमता ही नऊ लाख मेट्रीक टन इतकी आहे, मात्र आपल्याला दरवर्षी दीड लाख मेट्रीक टन उसाची कमतरता भासते.ऊस लागवडीचे वेळापत्रक पाळा गाळपाची हमी मी घेतो असा शब्दच चव्हाण यांनी या सभेत शेतक-यांना दिलाय.

उसाच्या दराबाबत त्यानी आपल्या भाषणात सर्व ऊहापोह करुन निवडणुका जवळ आल्याने कुणी काहीही बोलत असते.त्यामुळे शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे बुडवले मात्र आपण कुणाचाही एक रुपयाही थकीत ठेवला नाही असे त्यांनी स्पष्ट केलं. दररोज आपण सहा हजार मेट्रीक टन ऊस गाळप करू शकतो आता लवकरच ही गाळप क्षमता दहा हजार मेट्रीक टनावर न्यायची आहे जेणेकरून शेतक-यांच्या तक्रारी कमी होतील असे चव्हाण यांनी सभेत सांगितले.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, मधल्या काळात पैशांची अडचण होती तरीही कर्जाचा एकही हफ्ता आपण थकवलेला नाही. ऊस उत्पादक शेतक-यांचा विश्वास माझ्यासाठी महत्वाचा असून श्रद्धेय डॉ शंकरराव चव्हाण यांनी सुरु केलेला हा कारखाना आहे, त्याला गालबोट लागता कामा नये यासाठी शेतक-यांनी देखील सहकार्य करायला हवे. या साखर कारखान्यात माझं स्वतःच लक्ष असून ही संस्था चांगली चालली पाहिजे याची माझ्यावर जवाबदारी असल्याचे ते म्हणाले. याच सर्वासाधारण सभेत शेतक-यांना उसावरच्या पांढ-या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाममात्र दरात ड्रोनद्वारे फवारणी करता येणार असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले. या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला खासदार वसंतराव चव्हाण तसेच गणपतराव तिडके यांच्या सहचारिणी स्वर्गीय विमल तिडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सर्वसाधारण सभेला सकाळपासून पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित होते.