नांदेड l गझलकारा सुधाताई नरवाडकर यांच्या प्रत्येक गझलेत विचारांची खोली आहे. मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम व प्रभुत्व त्यांच्या दिलेल्या गझलेमध्ये जागोजागी जाणवते. अखिल मानव जातीबद्दल त्यांच्या मनात कळवळा आहे आणि त्यांचे गझलेवर नितांत प्रेम आहे. गझलेसाठी जणू त्या वेड्या झालेल्या आहेत. गझलेचे वेडं माणसाला आयुष्यात उभे करते.


तसेच कुटुंबाला सावरण्याची ऊर्जा देते. अध्यात्म, हळुवार प्रेम, सामाजिक बांधिलकी, स्त्रीजीवन, स्त्री जीवनाचे विविध कंगोरे, विविध नाती, त्यामधील ताणतणाव, विद्यार्थ्याप्रती असणारा जिव्हाळा, निसर्गाची ओढ, देशभक्ती, मानवतेची सर्व मूल्ये त्यांच्या गझलेमध्ये आढळतात, असे मत कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध गझलकार अभियंता प्रवीण पुजारी यांनी व्यक्त केले.

जुन्या पिढीतील ज्येष्ठ साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या कन्या तथा मराठवाड्यातील गझलकारा श्रीमती सुधाताई नरवाडकर यांच्या ‘ गझलायण ‘ या गझलसंग्रहाचे प्रकाशन नांदेडमध्ये पार पडले. पी. आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशन, मुंबई यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार श्री. बापु दासरी (सेवानिवृत्त कल्याण अधिकारी, नांदेड) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण पुजारी, पुस्तकाचे प्रकाशक ह.भ.प. डॉ. शंतनु महाराज माळी (रसे), सुधाताई नरवाडकर यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपक बीडकर यांनी बासरीवर शारदा स्तवन सादर केले.स्वतः सुधाताईंनी स्वागत गीत गायिले. या वेळी बोलताना शंतनु महाराज माळी म्हणाले, सद्गुणांमुळे मनुष्य चिर:काल तरुण राहतो. सुधाताईंच्या गझलांमध्ये भाव-भावनांचे बंध आहेत. त्यांची गझल प्रत्येकाला आपलीशी वाटते.

अध्यक्षीय समारोप करताना बापू दासरी म्हणाले, सुधाताईंचे जीवन म्हणजे एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याच्या हातावर अत्तर लावण्यासारखे आहे. तर लावणाऱ्याच्या हाताला सुगंध दरवळत असतो.
या कार्यक्रमाचे आयोजन इंजि. पद्मजा आलुरकर, डॉ. मंगेश नरवाडकर, इंजि. स्वाती नरवाडकर , डॉ. राजेश नरवाडकर आणि संपूर्ण नरवाडकर परिवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंतराव वाकोडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ राजेश नरवाडकर यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील साहित्यिक क्षेत्रातील लेखक, कवी, गझलेवर प्रेम करणारे रसिक, संगीत क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध लेखिका आशाताई पैठणे, बाल साहित्यिक प्रशांत गौतम, चित्रकार व बासरी वादक दीपक बिडकर, जयंतराव वाकोडकर यांचा सत्कार करण्यात आला.
माझ्या कुटुंबाने संगीत व गझल शिकण्यासाठी मला पाठिंबा दिला. सारिका अपस्तंभ-पांडे यांच्यासारख्या गुरु मला संगीत क्षेत्रामध्ये व अभियंता प्रवीण पुजारी यांच्यासारखे गझलेच्या क्षेत्रातले गुरु मला लाभले. मनुष्य जे जगत असतो, त्याचेच प्रतिबिंब साहित्यात मांडत असतो. मी व माझे लेखन हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत, एखाद्या व्रताप्रमाणे मी गझलेला अंगीकारलेले आहे.
. सुधाताई नरवाडकर
गझलायण पुस्तकाच्या लेखिका