नांदेड l नांदेड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूना बळ देण्यासाठी नांदेड येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाध्यक्ष होटाळकर यांनी दादांची भेट घेऊन मागणीची निवेदन सादर केले.


यावेळी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर , राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , माजी आमदार अविनाश घाटे , माजी आमदार तथा नांदेड महानगर अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे , प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
राज्यातील क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अनेक जिल्ह्यावर क्रीडा संकुलाची उभारणी होत आहे.


यात नांदेड जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राला बळकटी मिळावी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूनाही राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक करता यावा यासाठी नांदेडमध्ये क्रीडा संकुल उभारणीसाठी मंजुरी मिळाली होती. परंतु जमीन हस्तांतरित करण्यात आली नाही . नांदेड शहरालगत असलेल्या असर्जन कौठा भागातील 25 एकर जागेवर हे संकुल उभारण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.


या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून क्रीडा संकुल उभारणीसाठी जमीन हस्तांतरित करून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होटाळकर यांनी अजितदादांकडे केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने बोलताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणाले की, बीड येथे नुकतेच क्रीडा संकुल मंजूर केले आहे. त्यामुळे नांदेड येथेही क्रीडा संकुल मंजूर होण्याच्या अनुषंगाने सकारात्मक दृष्ट्या उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी व्यक्त केला आहे.



