नांदेड| राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची अंमलबजावणी करताना कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.


राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावनी, आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली, नियतन, उचल, वाटप, अन्न वितरणप्रणालीबाबतच्या तक्रारी, पोषण, पोषण आहार याअनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, तालुक्याचे पुरवठा निरीक्षण, एकात्मिक महिला व विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, मनपा, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आदींची उपस्थिती होती.


नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या, पुरवठा विभागाचे कार्यालये याठिकाणी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्या नावाचे बोर्ड तात्काळ दर्शनी भागात लावावेत अशा सूचना अध्यक्ष महेश ढवळे त्यांनी दिल्या. शासनाच्या कल्याणकारी योजना गरजू लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. मय्यत, स्थलांतर, लग्न होवून बाहेर गावी गेलेल्या महिला यांची यादी तात्काळ तयार करुन ताळमेळ काढा. जोपर्यत सर्वेक्षण होणार नाही तोपर्यत याद्या अद्ययावत होणार नाहीत याची काळजी तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांनी घ्यावी. त्यांच्या नियंत्रणाखाली रेशन दुकानांचे नियंत्रण करा. मागेल त्याला रेशन आणि रेशनकार्ड द्या अशा सूचना आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे यांनी दिल्या.


यासोबत त्यांनी शहरी भागात वर्दळीच्या ठिकाणी भिक्षुक महिला व मुलांचा सर्वे करुन त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचल्याचा आनंद होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांनी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांची तालुकानिहाय संख्या, शिधापत्रिकांची संख्या, मोफत अन्नधान्याचे वाटप, आधार सींडीगची माहिती, नियतन, उचल वाटप, इष्ठांक, जिल्ह्यातील एकूण गोदामे व क्षमता, नव्याने वितरीत केलेल्या शिधापत्रिका याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

शालेय पोषण आहार : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
नांदेड जिल्ह्यातील शाळेत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सहाय्याने शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून देण्यात येतो. या अंगणवाडीतील मुलांना पोटभर जेवण मिळते का, शाळेत ज्या तांदुळाची खिचड शिजविण्यात येते त्यांची चव, दर्जा तपासा, डब्बामुक्त जिल्हा करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. यासाठी वारंवार शाळांना भेटी द्या, शाळांना वितरण केलेल्या खाद्य मालाची तपासणी करण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना द्या अशा महत्वाच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी व त्यांना वितरीत करण्यात आलेल्या आहाराबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच अंगणवाडी व सुपरवायझर यांनी गरजू व पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ मिळवून देण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच कमी वजनाची बालके, गरोदर माता, जन्मापूर्वी कमी वजन असलेली बालके यांचा शोध घेवून त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करा निर्देश श्री. ढवळे यांनी दिले. जिल्ह्यातील तांडा, वस्त्या, आदिवासी पट्टे या भागातील लहान मुलांना पोषण होईल यादृष्टीने सर्वानी काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तृतीयपंथीय यांना रेशन कार्ड व राशन मिळण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणार असून त्यांचे प्रश्न शासनस्तरावर मांडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


