नांदेड| शहरातील गुरुद्वारा परिसरात असलेल्या शाहीदपुरा भागात चार अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असुन, त्यात दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या गोळीबारामुळे शहर हादरले असून (Nanded city was shaken by firing!) नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गोळीबार घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त लाऊन शाहिदपूरा परिसर सील केला आहे . गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ झालेल्या गोळीबार भागात चार चाकी वाहनात गुरमीत सिंग जगिंदर सिंग सेवादार आणि त्याचा मित्र रवींद्र सिंग दयासिंग राठोड हे दोघे जात होते, यावेळी अचानक अज्ञात चौघांनी त्यांच्यावर हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे .

चार चाकी वाहनात बसलेल्या दोघांवर अज्ञात चौघांनी आज सकाळी 9 ते 9.15 वाजेच्या दरम्यान गोळ्या झाडल्या आणि दुचाकीवरून पसार झाले. हल्लेखोरांनी दहा गोळ्या फायर केल्या असल्याचे सांगितले जात असून, घटनास्थळावर तीन गोळ्याचे साहित्य सापडले आहेत. आठ गोळ्या ह्या गुरमीत सिंगला लागल्या आसल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगितले असून, रवींद्र सिंग राठोड याला दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

एकूणच या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा नांदेड शहर हादरले असून, या घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व त्यांचे सहकारी करत आहेत, याबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले कि आमचा तपस सुरु आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
