किनवट, परमेश्वर पेशवे। अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल तालुक्यातील इस्लापूर जिल्हा परिषद प्रभागातील व परिसरातील संस्थेमधील कर्मचारी ही संस्थेत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यास शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याची विदारक दृश्य इस्लापूर परिसरात पहावयास मिळत आहे.
या मथळ्याखाली दिनांक 4 रोजी नांदेड न्यूज लाईव्हने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल किनवट येथील गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी गांभीर्याने घेतली. व शिक्षण विभागाचे प्रशासन हे खडबडून जागी झाल्याची जाणीव पुन्हा एकदा या भागातील जनतेला झाली व लागलीच अतिदुर्गम भागात असलेल्या या शाळेला वृत्त प्रकाशित झाले त्याच दिवशी या शाळेला भेट दिली. व दुर्गम भागातील या शाळेचा शोध शिक्षण विभागाने घेतला.
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या दिनांक 1 रोजी हजेरी पटावरील सह्या असल्याच्या निदर्शनास आल्या. सदरील शाळेत मुख्याध्यापिका हजर नसताना दिनांक 2 ते 5 या तारखेपर्यंतच्या रजेचा अर्ज कार्यालयात ठेवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. या सर्व धक्कादायक बाबी गटशिक्षणाधिकारी यांच्या समोर आल्याने त्यांनी आश्चर्यच व्यक्त केले. चिखली येथे प्रतिनियुक्तीवर लेखी आदेश न देता शिक्षकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सुद्धा याप्रसंगी उघडकीस आली .
गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळपणे दुर्गम भागातील या शाळेला दिलेली भेट म्हणजे मस्तवाल संस्था चालकाला चापच म्हणावा लागेल अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया जनसामान्यातून ऐकायला मिळत आहेत. त्यातच संस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता संस्थाचालकाच्या दबावाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांनी मात्र मुख्याध्यापिका या नेहमी शाळेला येतात अशी कबुली जवाब दिली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांचे कार्यालयीन कर्मचारी कराड यांनी नांदेड न्युज लाईव्ह शी बोलताना दिली.
परंतु सदरील बातमी पूर्ण सत्यता असल्याची बाब ही अधिकाऱ्याच्या निदर्शनास आली याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून याप्रकरणी लागली दोन ते चार दिवसांमध्ये अहवाल जिल्हा परिषद नांदेड यांना सादर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे मात्र परिसरातील अनेक संस्था चालकाचे धाबे दणाणले असून शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे जनमानसातून व शिक्षण प्रेमी मंडळी कडून समाधान व्यक्त केले जात आहे.