हिमायतनगर,अनिल मादसवार| बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात दि. १० डिसेंबर मंगळवारी बांगलादेशी हिंदूसाठी न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच सर्व व्यापाऱ्यांनी बांधवानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन अत्याचाराचा निषेध करत या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने लक्ष घालावे. या प्रमुख मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
मानवाधिकार परिषदेने जागतिक स्तरावर हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची कधीच दखल घेतली नाही. बांगलादेशात हिंदूवरच नाही तर अन्य अल्पसंख्यक समुदायावर अनन्वित्त अत्याचार केले जात आहेत. तरीदेखील राष्ट्र व मानवाधिकार संयुक्त परिषद यावर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करीत आहे. बांगलादेशात हिंदू संत, मंदिर, हिंदू संस्था असुरक्षित असून, दररोज हल्ले होत आहेत. भारत सरकार जागतिक पातळीवर बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहे.
हिंदू बांधवांवर जगात कुठेही अन्याय होत असेल तर त्याचा भारतातील हिंदू समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध केला जात असल्याचा संदेश संपूर्ण जगात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू समाज हा भारतात बहुसंख्य असला तरी जागतिक पातळीवर अल्पसंख्य आहे. यासाठी संयुक्त राष्ट्राने याची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर हनुमान चालीसा पठाण करून झाली. शहरातील मुख्य रस्त्याने हाती निषेधाचे विविध संदेश देणारे फलक घेऊन शेकडोच्या संख्येने सकल हिंदू समाजातील युवक, जेष्ठ नागरिक सामील झाले होते. निषेध रैली परत श्री परमेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर येथे उपस्थित हिंदू समाजाला मार्गदर्शन केल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. या मोर्च्यात हजारोच्या संख्येने सकल हिंदू समाजबांधव सामील झाले होते. दिवसभर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. मोर्चा शांततेत संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख बंदोबस्त लावला होता.