नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. देगलूर पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांना प्रदान करण्यात आले.
देगलूर पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली.
हे नामांकन मिळवण्यासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी दतात्रय कुरूंदे, कक्ष अधिकारी मस्णाजी कावटवार, कृषी अधिकारी संजीव लहाणे, विस्तार अधिकारी बालाजी उमाटे, लेखाधिकारी निरंजन जाधव, पशुधन अधिकारी, (विस्तार) पाशमवार, पंचायत समितीचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचा-यांनी विषेश परीश्रम घेतल्यामुळे पंचायत समिती देगलूर कार्यालयास आयएओ नामांकन प्राप्त झाले आहे.