नांदेड। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह त्यांना सृजनशील बनवण्यासाठी हादगावचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांची मेहनत व प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले.


बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने आज नांदेड येथे गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, सचिव दत्ताहरी धोत्रे, बाबुराव कसबे, संजय नरवाडे, मिलिंद चावरे, अशोक दामोदर, रवी लोहाळे, मिलिंद व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.


डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फोले यांनी हादगाव तालुक्यात विविध उपक्रम राबवले आहेत. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनांमध्ये हादगाव तालुक्यातील शाळा नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

रिक्त पदांची समस्या असूनही गुणवत्तेवर भर
सत्काराला उत्तर देताना किशन फोले म्हणाले की, बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन ही संस्था तळागाळातील लोकांसाठी कार्यरत आहे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हादगाव तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्ता पोहोचावी, यासाठी प्रशासन व शिक्षक मेहनत घेत आहेत. मात्र, सध्या केंद्रप्रमुखांची 10, विस्तार अधिकाऱ्यांची 4, प्राथमिक शिक्षकांची 35, मुख्याध्यापकांची 40 तर विविध विषयांच्या पदवीधर शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. तरीही शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता टिकून आहे. ऑपर आयडी, यू-डायस, SQAAF, FLN आणि निपुण महाराष्ट्र यासारखे कार्यक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवले जात असल्याचे फोले म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताहरी धोत्रे यांनी केले, तर आभार मिलिंद व्यवहारे यांनी मानले. कार्यक्रमास बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
