श्रामणेर दीक्षाभूमीचे संकल्पक – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

0
1

आंबेडकरी चळवळ मूळातच विश्वव्यापी विचारांची चळवळ आहे. कारण आंबेडकरी विचारच वैश्विक विचार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीतच आंबेडकरी चळवळीचे संविधान लिहिले. ते आजही सर्वांनाच लाभदायक, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरते. आंबेडकरी विचार हा विश्वकल्याणाचा विचार आहे. मानवासह जीव जंतू आणिक विश्वकल्याणाचा विचार आहे. १९५६ नंतर ही चळवळ धम्मचळवळ म्हणून प्रवाहीत होते. ही चळवळ बुद्ध विचारांचे सौंदर्य लपेटून घेऊन पुढे जाते. कुण्या एखाद्या कार्यकर्त्याच्या किंवा संघटनेच्या कार्यावर अथवा विचारधारेवर धम्म चळवळीची महत्तम दिशा ठरत नाही. इतर बौद्ध राष्ट्रांप्रमाणे भारतातही धम्मचळवळ व्यापक स्वरूपाची आहे.

मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका यांच्यात बौद्ध तत्त्वज्ञानाची पेरणी करावी लागणे आजची गरज म्हणून निर्माण होत असेल तर अगदी मुळापासून या कार्याची सुरुवात करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी सांगितलेली चळवळीचा गाडा ओढत मी इथवर आणला आहे, जर तुम्हाला तो पुढे नेता आला तर तो न्यावा नाही तर किमान मागे तर नेऊ नका; आहे तिथेच तरी ठेवा ही शिकवण असल्याचे आपण नेहमीच एकमेकांना सांगत असतो. मात्र हे सतत सांगण्यातून आणि ऐकण्यातून नकारार्थी भाव उत्पन्न होतात. आपल्याला हा धम्मरथ पुढे न्यायचाच आहे. मागे तर कदापिही न्यायचा नाही आणि आहे तिथेच तर ठेवायचाही नाही ही खुणगाठ इथल्या प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी मनाशी बांधून ठेवायची आहे. अशी खुणगाठच नाही तर आपल्या आयुष्याचा ध्यासच आपल्या कामातून आणि विचारधारेतून मांडणारे भदंत पंयाबोधी थेरो हे आजच्या काळातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शब्द परवलीचा मानून कार्यरत राहणाऱ्या भिक्षूंपैकी एक आहेत. धम्मध्वज सतत तेजाने, त्वेषाने आणि डौलाने फडकत ठेवण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे.

भदंत पंयाबोधी थेरो यांनी गेल्या पाच सहा वर्षांपासून महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातील खुरगाव नांदुसा परिसरात श्रद्धावान उपासक उपासिकांच्या निढळाच्या घामातून श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली आहे. वयाच्या २१ व्या वर्षांपासून त्यांनी चिवर धारण केले आहे. श्रामणेर दीक्षा धम्मचळवळीत मैलाचा दगड ठरते अशी त्यांची धारणा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दीक्षेचे कार्यक्रम तथा प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले पाहिजेत असे त्यांना वाटते. म्हणूनच भंतेजींनी १० दिवसांच्या आणि अधिक अशा अनेक श्रामणेर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. आत्तापर्यंत शेकडो उपासक, उपासिका, बालक, बालिका यांना दीक्षा दिली आहे. यावर्षीच्याच जून महिन्यात १५ दिवसांचे श्रामणेरी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. भदंत पंयाबोधी थेरो हे खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालकच नाहीत तर अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्षही आहेत.

तमाम बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका हे त्यांना धम्मगुरु मानतातच पण सातत्याने त्यांनी भिक्खू संघाचे नेतृत्व केलेले असल्याने सप्तरंगी साहित्य मंडळाने त्यांना संघनायक ही पदवी दिली आहे. असे हे धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो स्वस्थ बसून राहणाऱ्या भिक्षूंपैकी नाहीत. त्यांनी नांदेड, लातूर, परभणी हिंगोली शहर आणि परिसरातही आपल्या कार्याची छाप सोडली आहे. अनेक उपक्रम आणि संकल्पना राबवित लोकांमध्ये धम्मानुकरणाचा संचार निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. वर्षावास काळातील ग्रंथवाचन, धम्म पर्यटन, धम्मसंदेश व धम्मदान यात्रा, धम्मदेसनेचे कार्यक्रम, बाल श्रामणेर शिबिरे, धम्म परिषदा, धम्मदीक्षा आदी उपक्रमांतून लोकांमध्ये चळवळीचे चैतन्य निर्माण केले आहे.

एवढेच नव्हे तर सर्वरोग निदान शिबिर, रक्तदान शिबीर, भोजनदान, महा बुद्धवंदना, वृक्षारोपण अशा विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले आहे. खुरगावच्या पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणावरील काही भूभाग प्राणीमात्रांबद्दलची भूतदया निर्माण होण्यासाठी आणि ती कायम टिकवून ठेवण्यासाठी वनक्षेत्रात परिवर्तीत करण्यासाठी हवा आहे. याठिकाणी अहिंसक रानटी पशुपक्ष्यांचा राबता असावा आणि या निमित्ताने वन्य प्राण्यांचे संवर्धन व्हावे असा त्यांचा मानस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या वर्षी तब्बल दोन हजार झाडांचे वृक्षारोपण आणि संगोपन करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. भिक्षू हे निसर्गप्रेमी असतात, नव्हे ते असलेच पाहिजेत. आत्तापर्यंत पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, मनपामधील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम घडवून आणले आहेत. केवळ वृक्षारोपण केले म्हणजे संपले असे नाही तर ते झाड अगदी मोठे होईपर्यंत त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे असे ते म्हणतात. जर आपली एवढी तयारी असेल तरच वृक्षारोपण करावे, अन्यथा दिखावा करु नये असे ते स्पष्टपणे सांगतात. पंयाबोधी हे निस्सीम पर्यावरणवादी आहेत. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचा परिसर विविध फुलझाडे, आकर्षक आणि बहारदार वृक्षांनी बहरला आहे. ते नेहमीच या सर्व लहान मोठ्या झाडांची काळजी घेतात. तसेच या परिसरात भेट देणाऱ्या सर्वांनाच काळजी घेण्यास सांगतात.

श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने निघालेली भिक्खू संघाची धम्मसंदेश व धम्मदान यात्रेने धम्मचळवळीत फार मोलाचे योगदान दिले आहे. ही यात्रा गावागावात जाऊन लोकांना धम्मकार्याद्वारे चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करते. ही यात्रा विविध ठिकाणच्या धम्म परिषदांमध्येही सहभागी होते. आपण सतत कुशल कम्म केले पाहिजे. वाईट विचारांना आपल्या जवळही भटकू देऊ नये. षड्विकारांना आपल्यातून कायमचे घालवावे. या विकारांचा कायमचा नायनाट करावा. चारित्र्य जपावे. शिलवान व्यक्तीच समाजात उच्चतम प्रतिष्ठेला प्राप्त होतो. व्यक्ती कितीही विद्वान असला तरी चारित्र्यावरुनच त्याचे व्यक्तिमत्त्व दिसून येते. मुलांवर योग्य संस्कार करावेत. हीच आपली खरी संपत्ती आहे. आपणच आपल्या संपत्तीचे दायाद बनले पाहिजेत. तसेच भिक्खू संघाला नेहमीच भोजनदान दिले पाहिजे. धान्य, चिवर, फळे, औषधी, दैनंदिन वापरातील वस्तू यांचे दान दिले पाहिजे. तसेच आर्थिक स्वरूपाच्या तसेच विहाराच्या बांधकामासाठी वीट, वाळू, गजाळी, सिमेंट किंवा बोअर घेणे अशा स्वरुपातही आपण दान पारमिता करु शकता असे आणि धम्मदेसनेच्या माध्यमातून प्रासंगिक स्वरूपाचे धम्मज्ञानाचे दान ही यात्रा करते. दर पौर्णिमेला खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रत्येक महिन्याच्या १९ तारखेला धम्म मेळावा भरतो. यास पौर्णिमोत्सव असे संबोधण्यात येते. वर्षभरात कोणत्याही दिवशी दीक्षा दिली जाते. वर्षातील ३६५ दिवस दीक्षा देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र म्हणून ते उदयाला आले आहे. याच तारखेला दसदिवशीय श्रामणेर शिबिराचा समारोप केला जातो. दीक्षा घेऊन श्रामणेर जीवन जगण्याचा तसेच कायमस्वरूपी भिक्खू म्हणून दीक्षा घेण्याचा आणि भिक्खू संघास एक अपत्य दान करण्याचा संदेश देऊन ही यात्रा परतते.

यावर्षी पहिल्यांदाच जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने महाधम्मध्वज महापदयात्रा काढण्यात आली. ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्मध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे यासाठी सन १८८० मध्ये ‘विश्व बौद्ध धम्म ध्वजाची’ निर्मिती करण्यात आली. विश्व बौद्ध धम्मध्वज दिन समस्त भारतीय बौद्धांचा सण, उत्सव, सोहळा व्हावा यासाठी जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी बौद्ध उपासक किंवा उपासिकांनी आपल्या घरांवर पंचशील धम्मध्वज उभारुन विश्व धम्मध्वज दिन साजरा करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले होते. जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त नांदेड तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातून १४४ फुटांच्या पंचरंगी धम्मध्वजाची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात खुरगाव पाटी, पासदगाव, नेरली फाटा ते नांदेड शहरातील भावसार चौक, तरोडा नाका, राज काॅर्नर ते फुले पुतळा, भ. गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची नियोजित जागा शिवाजी नगर, कलामंदिर मार्गे शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. दोन किमी रस्ता भरलेल्या या पदयात्रेत भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारो बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाले होते. या पदयात्रेचा समारोप रेल्वेस्टेशन नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. भंते शिलरत्न यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेने महापदयात्रेचा समारोप करण्यात आला होता.

विविध संकल्पना प्रत्यक्षात साकार करुन धम्मचळवळीला बळकटी आणण्यासाठी भदंत पंयाबोधी थेरो हे सतत प्रयत्नशील आहेत. श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दहा लाख रुपयांची अकरा फुटांची बुद्धाची आशिर्वाद मुद्रेतील संगमरवरी मूर्ती साकारली गेली आहे. याच परिसरात श्रामणेर दीक्षाभूमीचे बांधकाम भव्य स्वरूपाचे होत आहे. यावर ही मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे. या स्तूपात एक सुसज्ज ग्रंथालयासह वाचनालय, भिक्खूंच्या निवासाची सोय, विपश्यना केंद्र, भव्य प्रशिक्षण हाॅल, एकाच वेळी शेकडो लोक भोजन घेऊ शकतील अशी व्यवस्था असणार आहे. या बांधकामासाठी आणि संपूर्ण रचनात्मक पूर्णतेसाठी तीन साडेतीन कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर दान करण्याची गरज आहे. यासाठी दानदात्यांनी पुढे आले पाहिजे. ही अत्यावश्यक सेवा बनली आहे. कोणतेही सरकार किंवा सरकार पुरस्कृत संस्था तसेच कोणतीही कंपनी, खाजगी संस्था अगदी कुणीही आर्थिक मदत करु शकणार नाही. ती दिली तरी स्विकारली जाणार नाही. राजकीय पक्ष, संघटना किंवा व्यक्ती यांचा शिरकाव होऊ दिला जाणार नाही. वेळ लागेल परंतु बौद्ध उपासक उपासिकांच्या निढळाच्या घामावरच ही वास्तू उभी राहिली पाहिजे, असा भंतेजींचा मानस आहे. म्हणून भंतेजींचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशा मंगल कामना सर्वत्र व्यक्त होत आहेत. त्यामुळेच खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे धम्म सौंदर्य अधिकाधिक खुलत आहे. अनेक ठिकाणांहून लोक मदत करीत आहेत. आपण सर्वांनीच यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांचे अनेक संकल्प भविष्यात पूर्णत्वास जावोत तसेच हा धम्मरथ मागे नाही तर पुढेच जात रहावा, ही चळवळ सतत वृद्धिंगत होत रहावी आणि भदंत पंयाबोधी थेरो यांना यासाठी सशक्त आरोग्य लाभावे यासाठी मंगल चिंतीतो आणि थांबतो.

लेखक- प्रज्ञाधर ढवळे, नांदेड, मो. 9890247953.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here