नांदेड| रेशनकार्डवरील नावे कमी करणे, नाव वाढविणे व नवीन शिधापत्रिका काढण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व सेतु सुविधा केंद्रामार्फतच करावीत. याकामासाठी कुठल्याही मध्यस्थाच्या, एजेंटच्या दलालाच्या भुलथापास बळी पडू नये, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे. अशा प्रकारचे असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागू केलेल्या कागदपत्रामध्ये राशनकार्ड आवश्यक आहे. यामुळे राशनकार्डात नाव टाकणे, वगळणे व नवीन राशनकार्ड काढणे याबाबत कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालयाच्या आवारात काही दलाल कार्डधारकास भुलथापा देऊन व आर्थिक पिळवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिनांक 11 जुलै रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी कार्डधारक आले असता तहसिलदार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक माधव विक्रम गोरे यांनी ही कागदपत्रे तपासली असता ऑनलाईन शिधापत्रिका बोगस असल्याचे आढळून आले आहे. सदर कार्डधारकास विचारणा केली असता त्यांनी एका व्यक्तीचे नाव मध्यस्य म्हणून सांगितले आहे. सदर व्यक्तीवर पो.स्टे वजीराबाद नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राज्य शासनाकडून अत्यंत चांगली योजना आली आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये सर्व समाज घटकांना समाविष्ट करण्यात आलेले आहे. यासाठी कोणत्याही एजंट मध्यस्थ दलालाच्या मागे नागरिकांनी लागू नये. कोणालाही कुठेही पैसे देण्याची गरज नाही आहे. अर्ज भरणाऱ्यासाठी शासनाने प्रति अर्ज 50 रुपये भत्ता जाहिर केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणी पैसे मागत असल्यास तहसीलदारांच्या निर्देशास आणून द्यावे, असे आवाहन तहसीलदार नांदेड यांनी केले आहे.