हिंगोली। दि.४ एप्रिल रोजी आलेगाव ता.जि. नांदेड येथे विहिरीत ट्रॅक्टर कोसळून अपघात झाला होता. त्या अपघातातील गुंज (माळ) ता.वसमत जि.हिंगोली येथील मृत्तांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन व पाच एकूण सात लाखांची आर्थिक मदत घोषित केली आहे.


घोषित केलेली आर्थिक मदत तातडीने द्यावी व इतर मागण्याचे निवेदन माकपच्या वतीने दि.११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी हिंगोली यांना देण्यात आले. उपरोक्त मागणीसह खालील मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून प्रत्येकी पीडित कुटुंबियांना एक कोटी रुपये देण्यात यावेत.


प्रत्येक कुटुंबियांना पाच एकर ओलीतची जमीन देण्यात यावी.तसेच मयताच्या कुटुंबियांतील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी.वस्ताद लहुजी साळवे नगर मौजे गुंज (माळ)येथील राहिवास असलेल्या सर्व नागरिकांना पक्के घर बांधून देण्यात यावे.गुंज माळ येथे लाईट, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते व आवश्यक सर्व नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, हिंगोली माकप जिल्हा सचिव कॉ.चंपतराव नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ.विठ्ठल भंडारे,माकप नांदेड तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड,माकप राज्य कमिटी सदस्य कॉ.मारोती खंदारे,शेत मजूर युनियनचे राज्याध्यक्ष कॉ.बळीराम भुंबे,परभणी जिल्हा कमिटी सदस्य कॉ. रामराजे महाडिक, कॉ. रमेश देवरे (हिंगोली) कॉ.जयराज गायकवाड (नांदेड) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.