आज दिनांक 15 ऑक्टोबर, जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने स्वच्छतेच्या महत्वावर आणि आरोग्यविषयक आदतांवर प्रकाश टाकणारा हा लेख आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने आरोग्य संरक्षित ठेवण्यासाठी आणि अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. हात धुणे, विशेषतः साबणाने, ही साधी क्रिया अनेक आजार टाळण्यास मदत करू शकते. हात धुण्याची सवय ठेवल्याने विषाणू, जिवाणू, आणि परोपजीवांपासून संरक्षण मिळू शकते. अस्वच्छ हातांमुळे होणाऱ्या अतिसार, विषमज्वर, कॉलरा, स्वाइन फ्लू, आणि इतर श्वसन आजारांचे प्रमाण खूप मोठे आहे.
1840 मध्ये डॉ. ईगनाज सेमेलवाईस यांनी हात धुण्याचे महत्व शोधून काढले. त्यांनी हे सिद्ध केले की, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हात स्वच्छ धुतल्यास बाळंतपणात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 50% नी घटले. त्यानंतर हात धुण्याचे महत्व सर्वत्र मान्य झाले.
करोनाच्या काळात हात स्वच्छ धुण्याची सवय लोकांमध्ये रुजली होती. मात्र करोना संपल्यानंतर काही लोकांनी ही सवय सोडली आहे. जागतिक हात धुवा दिवस याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. नियमित हात धुण्याची पद्धत शाळा आणि समाजात पसरवण्यावर भर दिला जातो.
हात धुण्याचे पाच टप्पे सांगितले जातात: १) पाण्याने हात ओले करणे, २) साबण लावणे, ३) तळवे एकमेकांवर घासणे, ४) बोटे एकमेकांत घालून घासणे, ५) नखं स्वच्छ करण्यासाठी बोटांची टोके तळव्यावर फिरवणे, आणि नंतर हात स्वच्छ पाण्याने धुणे.
लहान मुलांमध्ये अस्वच्छतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी हात धुण्याची सवय लावणे गरजेचे आहे. त्यामुळे घरी आणि शाळेत मुलांना ही सवय लावून त्यांचे आरोग्य चांगले ठेवता येईल. 2008 पासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे. हा उपक्रम युनिसेफ आणि इतर संस्थांनीही स्वीकारला आहे. साबण हा स्वस्त आणि प्रभावी उपाय असल्याने त्यावर विशेष लक्ष दिले जाते.
यावर्षी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी, नागरिक, महिला बचत गट, आणि इतर लोकांनी नियमित हात धुण्याचा संकल्प करावा आणि आपले आरोग्य राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिलिंद व्यवहारे, जिल्हा परिषद नांदेड (मो. 8626025825)